टिळकवाड्याचा उलगडला इतिहास   

हेरिटेज वॉक उपक्रमाला मोठा प्रतिसाद

पुणे : राष्ट्रीय चळवळीचे मुख्य केंद्र म्हणजे टिळकवाडा. याच वाड्यातून लोकमान्यांनी स्वराज्याची सिंहगर्जना केली. इंग्रजांना थरकाप भरवणारे अग्रलेख याच वाड्यात लिहिले गेले. आयुष्यभर लोकमान्यांनी स्वराज्य, राष्ट्र आणि समाजासाठी काम केले. देशभरातून टिळकप्रेमी, देशभक्तांच्या बैठका वाड्यात भरत होत्या, अशा शब्दांत अनेक ऐतिहासिक क्षणांना उजाळा देत लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी टिळकवाड्याचा इतिहास हेरिटेज वॉकमध्ये उलगडला. 
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ‘केसरी’ आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी रविवारी टिळक वाड्यात ‘हेरिटेज वॉक’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. टिळक बोलत होते.‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, टिमविच्या विश्वस्त सरिता साठे, टिमविच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, टिमविच्या साहित्य आणि ललित कला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मंजुषा गोखले, श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव, आमोद केळकर, हेरिटेज इंडिया संस्थेच्या वंदना बोलाखे व अन्य उपस्थित होते.
 
याप्रसंगी श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या अध्यापकांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅन ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. टिळक यांच्या हस्ते झाले. डॉ. मंजिरी भालेराव व डॉ. मनिषा पुराणिक यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. टिमविने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार असल्याचे डॉ. मनिषा पुराणिक यांनी सांगितले. लोकमान्यांनी केलेली वाड्याची रचना, त्यांच्या भेटीसाठी येत असलेले टिळकप्रेमी, स्वराज्यासाठी होणार्‍या बैठका, होमरुल लीगची चळवळ यांसह गोवा मुक्ती संग्रामाची चळवळदेखील या टिळक वाड्यातून झाली असल्याचे विविध दाखले देत डॉ. टिळक यांनी टिळकवाड्याचा इतिहास सांगितला. 
 
नागरिकांनी लोकमान्य टिळक संग्रहालयाला भेट देऊन लोकमान्यांचा इतिहास समजावून घेतला. लोकमान्यांच्या वापरातील वस्तू, लोकमान्य टिळक यांच्यासह विविध महापुरुषांचे दुर्मिळ फोटो, मंडाले कारागृहाची प्रतिकृती पाहून नागरिक भारावून गेले होते. हेरिटेज वॉकला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळकांचा ‘केसरी’ याच वाड्यातून अव्याहतपणे प्रकाशित होत आहे. ‘केसरी-मराठा’ संस्थेने वारसा जपला आहे. या वाड्यात असलेल्या लोकमान्य टिळक संग्रहालयात त्यांच्या विविध आठवणी जतन करण्यात आल्या आहेत, असे डॉ. टिळक यांनी सांगितले. ते म्हणाले, गोवा मुक्ती संग्रामाचे  हेच मुख्य केंद्र होते. ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची चळवळ येथनूच सुरु केली. अनेक नेते या ठिकाणी येत होते.
 
डॉ. मंजिरी भालेराव म्हणाल्या, वारसाप्रेमींसाठी दर महिन्यातून एक दिवस ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम आयोजित केला जाणार आहे. १० वर्षांपूर्वी टिमविने हा उपक्रम सुरु केला होता. हेरिटेज वॉक उपक्रम टिमविच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवला जात आहे.आता पुन्हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी हा उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.डॉ. अकल्पिता सप्रे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना बोलाखे यांनी आभार मानले.

Related Articles