खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक   

लोणावळा : शहरातील खंडाळा पोलिस चौकीच्या मागील बाजूला गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या २३ गाड्या जळून खाक झाल्या. या गाड्यांमध्ये १९ दुचाकी, एक मालमोटार, एक रिक्षा आणि दोन मोटारींचा समावेश आहे. गाड्यांच्या आजूबाजूला वाढलेले गवत पेटून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिकांच्या मदतीने आयआरबीच्या देवदूत अग्निशमन दलाच्या साहाय्याने दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.
 
उन्हाचा पारा वाढू लागल्याने सध्या अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोला बुधवारी रात्री पासून लागलेली आग अजून पूर्णतः विझली नसताना गुरुवारी पोलिस चौकीजवळ आग लागण्याची घटना घडली. उन्हाचा पारा वाढू लागल्याने अशा आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर आता लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोणावळा पोलिस  पुढील तपास करीत आहेत.

Related Articles