केसरीवाड्यात हेरिटेज वॉक   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, दैनिक केसरी आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी हेरिटेज वॉक या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नि:शुल्क असून, श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवला जाणार आहे.
 
हा हेरिटेज वॉक ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता टिळक वाड्यात होणार आहे. लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यावेळी टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक उपस्थित राहणार आहेत.लोकमान्य टिळकांची केसरी आणि मराठा  ही वृत्तपत्रे याच वाड्यातून प्रकाशित होत. आजही तोच वारसा केसरी-मराठा संस्थेने जपला आहे. या वाड्यात असलेल्या लोकमान्य टिळक संग्रहालयात त्यांच्या विविध आठवणी जतन करण्यात आल्या आहेत. या हेरिटेज वॉकमध्ये संग्रहालय देखील पाहता येणार आहे.
 
यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्राच्या अध्यापकांनी लिहिलेल्या ‘भारतीय ज्ञानप्रणालीचा संक्षिप्त आढावा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी सकाळी ९.४५ वाजता केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वारसाप्रेमी नागरिकांनी या ऐतिहासिक सफरीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
 
रविवार, ९ मार्च २०२५
स्थळ : केसरीवाडा, नारायण पेठ.
वेळ : सकाळी १०

Related Articles