घर खरेदीदारांना ‘महारेरा’चे बळ   

वृत्तवेध 

स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अनेक जण जीवतोड मेहनत करतात. आयुष्यभराची कमाई गुंतवणूक करतात. अशा ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर बळ देण्यासाठी ‘महारेरा’ने मोठे पाऊल टाकले आहे. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहे. ग्राहकांसाठी ‘महारेरा’ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. घर खरेदीपूर्वी या सूचना तंतोतंत पाळल्यास फसवणूक तर टळेलच; पण आयुष्यभराच्या जमापुंजीचे पण चीज होईल. कोणत्याही गृहप्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी जुजबी माहिती घेऊ नका. हक्काचे घर कायद्याच्या चौकटीत बसते, की नाही हे अगोदर तपासा. संबंधित प्रकल्पावर न्यायालयीन खटला सुरू आहे का? त्याचा तपशील घ्या. एखादा कर्जाचा बोजा प्रकल्पावर आहे का? ती माहिती घ्या. भागीदारांमध्ये वाद तर सुरू नाही ना? हे तपासा. इतकेच नाही तर फ्लॅट खरेदीपूर्वी, घर खरेदीपूर्वी ‘महारेरा’ने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्याची खातरजमा हा प्रकल्प, विकासक करतो की नाही ते डोळ्यात तेल घालून तपासा.
 
‘या’ गोष्टी अगोदर तपासा
 
नवीन घराची नोंदणी करताना ‘महारेरा’ नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा. निवडलेल्या प्रकल्पात या गोष्टींची पूर्तता आहे की नाही, याची खातरजमा करा. संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून दिला जाणारा मंजुरीचा आराखडा. प्रारंभ प्रमाणपत्र. भूखंडाचा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट. संबंधित प्रकल्पावर न्यायालयात खटले सुरू आहेत का ? संबंधित प्रकल्पावर ‘बोजा’ आहे का? पार्किंग व सेवा सुविधांच्या निर्धारित तपशिलासह महारेरा प्रमाणीकृत घर 
 
विक्रीकरार, घर नोंदणीपत्र आहे ना?
 
सुरक्षित घर खरेदी / घर नोंदणीसाठी हेही आवश्यकच. ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक. ‘महारेरा’ने ठरवून दिलेल्या ‘‘आदर्श घर खरेदी करारानुसारच’’ करार. एकूण रकमेच्या १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर नोंदणी / घर खरेदी करत असाल तर विकासकाला घरविक्री करार करणे बंधनकारक आहे. ‘महारेरा’कडे नोंदणीकृत मध्यस्थामार्फतच जागेचा व्यवहार करा.
 
‘महारेरा’ नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
 
आर्थिक शिस्त : घर खरेदी / घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांपैकी ७० टक्के बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक. पारदर्शकता : प्रकल्पाची सविस्तर माहिती ‘महारेरा’ संकेतस्थळावर. प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्याला ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर नोंदवणे विकासकाला बंधनकारक. प्रकल्पासंबंधी तक्रार असल्यास ‘महारेरा’कडे दाद मागण्याची सोय. ‘महारेरा’च्या संकेतस्थळामार्फत घरबसल्या प्रकल्पाचे संनियंत्रण शक्य.

Related Articles