वाचक लिहितात   

शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारणार?
 
देशातील ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या वर्तमान परिस्थितीचा सर्वांगीण लेखाजोखा मांडणारा ’प्रथम शिक्षण फाऊंडेशन’ या अशासकीय स्वयंसेवी संस्थेचा ‘असर’ (न्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट-२०२४) हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालानुसार २९ राज्यांतील ६०५ जिल्ह्यांतील एकूण १८ हजार शाळांमधील सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांचे भाषा, वाचन कौशल्य, आकलन, गणित या अनुषंगाने शैक्षणिक दर्जाचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार राज्यातील पहिलीतील २६ टक्के विद्यार्थ्यांना एकही अक्षर ओळखता आलेले नाही. अक्षर ओळख असलेल्या साडेसहा टक्के विद्यार्थ्यांना पहिली इयत्तेच्या स्तरावरील उतारेही वाचता आले नाहीत. आठवीतील ४० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकाराचे साधे गणित जमले नाही, तसेच आठवीतीलच २५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरी इयत्तेच्या स्तरावरील उतारा वाचता आला नाही. आठवीनंतर शाळा सोडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सन २०२२ च्या तुलनेत अर्धा टक्क्याने वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे आठवीतील एक टक्का विद्यार्थ्यांना अक्षरओळख नसल्याचे, तसेच ३४ टक्के विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतचे आकडे येत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व स्तरांवर उपाययोजना करण्याची गरज आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
योग्य निर्णय
 
नवीन शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) शालेय पाठ्यपुस्तकात जोडली जाणारी कोरी पाने काढून टाकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मुळातच दोन वर्षांपूर्वी पुस्तकात कोरी पाने जोडण्याचा निर्णय चुकीचा आणि खर्चिक होता. शाळेत तासिका सुरु असताना विद्यार्थ्यांनी त्या कोर्‍या पानांवर टिपणे काढणे अपेक्षित होते; पण तसे न होता वह्यांचाच वापर नियमित 
अभ्यासासाठी केला गेला. साहजिकच पुस्तकात जोडली गेलेली कोरी पाने ही फक्त दप्तराचे ओझे वाढवण्यास कारणीभूत ठरली. शालेय शिक्षण विभागाने या निर्णयावर कायम राहतानाच शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय करुन इतर काही उपायांनी दप्तराचे ओझे आणखी कमी कसे करता येईल यावर 
भर द्यावा.
 
दीपक काशिराम गुंडये, वरळी.
 
सार्थ निवड
 
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार प्रसिद्ध नाटककार, अभिनेते व नाट्य दिग्दर्शक सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. नक्कीच या पुरस्कारासाठी झालेली निवड ही सार्थच आहे. त्यांची जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
 
संतोष दत्तू शिंदे, काष्टी, श्रीगोंदे
 
अतिरेकी भूतदया अपायकारक
 
सध्या प्राणी मित्रांच्या प्राणी प्रेमाला भरती आल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर पाहा; तुम्हाला एक तरी प्राणी प्रेमी रस्त्यांवरील भटक्या श्वानांना दूध, बिस्किटे, पाव, शिळे अन्न खायला घालताना दिसतील. काही पक्षी प्रेमी कबुतरांना फरसाण किंवा शेव खाऊ घालताना नजरेस पडतात. त्यांच्या याच प्राणी प्रेमामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढत चालली आहे. काही हॉटेलवाले, तसेच चायनीज गाड्यांवरील चायनीज विक्रेते त्यांच्याकडील शिळे अन्न भटक्या श्वानांना देत असतात. त्यामुळेच रस्त्यांवरील हे भटके श्वान टोळक्या टोळक्याने फिरताना दिसतात; मात्र हे श्वान विद्यार्थी, वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी तापदायक ठरू लागले असून भटक्या, चावर्‍या श्वानांनी हल्ला करून अनेकांना जखमी केले आहे. प्राणी प्रेमींच्या या अतिरेकी प्राणी प्रेमाचा त्रास शहरातील इतर नागरिकांना होत आहे.
 
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
 
निरर्थक वाद कशाला?
 
दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात पारंपरिक पेहराव, तसेच अंगभर वस्त्रे असलेल्या, स्त्री-पुरुषांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्या संबंधीचे वृत्त वाचले. यावर भाविक असे म्हणू शकतात की, मंदिर प्रशासन आम्हाला वस्त्रसंहिता लागू करणारे कोण? आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे कोण? परंतु यामागील कारण भाविकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. रांगेत उभ्या असणार्‍या इतर भाविकांनी मंदिर प्रशासनाकडे त्याबाबत तक्रार केली होती. मुळात कोणी कसे कपडे घालावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही भक्तांनी एका गोष्टीचे भान बाळगणे गरजेचे आहे, की आपण पवित्र स्थळी उभे आहोत. त्यानुसार अंगभरच कपडे घातलेले जास्त योग्य. आपण गुढीपाडवा, दसरा, दिवाळी यांसारख्या सणांना पारंपरिक पेहराव किंवा अंगभर कपडे घालून देवळात जातोच ना! दक्षिणेकडील मंदिरात गेलो तरी, स्त्री-पुरुषांसाठी त्यांनी जे पेहराव ठरवून दिले आहेत, ते निमूटपणे कुरकुर न करता घालतोचना. मग या ठिकाणी वस्त्रसंहितेवरून वाद कशासाठी?
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई

Related Articles