पाच लाख ‘लाडक्या बहिणी’ अपात्र   

दीड लाख बहिणींनी स्वतःहून घेतली माघार 

मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी करण्याचे काम जोरात सुरू असून, आत्तापर्यंत तब्बल पाच लाख बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. १ लाख ६० हजार महिलांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले असून, पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा सत्ताधारी महायुतीला निवडणुकीत झाला.  निवडणुकीपूर्वी योजनेसाठी आलेले अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले. त्यामुळे लाभार्थींची संख्या २ कोटी ४० लाखांच्या पुढे गेली होती. निवडणुकीनंतर मात्र लाभार्थींची छाननी सुरू झाली आहे. अपात्र ठरणार्‍या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत आहे. कारवाईच्या भीतीने अनेक महिला स्वतःच योजनेतून बाहेर पडत आहेत.  गेल्या महिनाभरात तब्बल पाच लाख अपात्र भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. यातील तब्बल दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या. तर १ लाख १० हजार महिला ६५ वर्षांवरील असल्याने या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी मोटार असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या १ लाख ६० हजार महिलांनी स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेतले असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. छाननी करण्याचे काम पुढेही सुरू राहणार असून अपात्र ठरणार्‍या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles