गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक   

पुणे : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा जप्त केला. नितीन भाऊसाहेब गोपाळ (वय २०, दत्त दिगंबर सोसायटी, साक्री रस्ता, धुळे) आणि लकी छोटु पवार (वय १९, लक्ष्मी नारायण कॉलनी, साक्री रस्ता, धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रस्त्यावरील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालय परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोघे जण संशयस्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांना पकडून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे ९६ हजार २० रुपयांचा ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा, २ मोबाइल असा १ लाख १६ हजार २० रुपयांचा माल आढळून आला. दोघेही मुळचे धुळे जिल्ह्यातील असून त्यांनी हा गांजा कोठून आणला याचा पोलीस तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, अंमलदार संदिप शिर्के, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, उदमले, खुटवड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles