वाचक लिहितात   

अतिउत्साहात प्रशासनाची कुचंबना
 
प्रयागराज येथे काही दिवसांपूर्वी तंबूंमध्ये आग लागली. त्यानंतर चेंगराचेंगरीत तीस भक्तांना प्राण गमवावे लागले. याला मानवी स्वभावातील उतावळेपणा, अतिश्रद्धा आणि गलथानपणा ही प्रथमदर्शनी मुख्य कारणे आहेत असे वाटते. मौनी अमावस्या, पवित्र स्नान यांचे धार्मिक महत्व असलेल्या या महाकुंभाची सर्व प्रकारच्या जाहिरातबाजीतून कौतुक करीत जेव्हढी प्रसिद्धी साधली गेली त्यामानाने मेळ्याच्या ठिकाणी व्यवस्था, व्यवस्थेची सक्षमता, गर्दीचे व्यवस्थापन, भक्तांचा संयम यांना मर्यादा राहिल्या नाहीत. भक्तांच्या संख्येचा भार वाहण्याची त्या शहराची क्षमता लक्षात जरी घेतली होती तरीही गर्दीला आवर घालण्यासाठी कितीही सक्षम यंत्रणेला अशा प्रसंगी ताबा ठेवणे शक्य झाले नसते. मेळाव्याला काही कोटी भक्तगण उपस्थित राहणार याचा अंदाज घेत कित्येक कोटी रुपयांचा खर्च केल्याची जाहिरात करण्यामागे कुंभमेळा हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न होता का? अशा शंका मनात येणे साहजिकच आहे. अशा मेळ्यांच्या ठिकाणी सुरुवातीस अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन व त्यांचे आदरातिथ्य, मानसन्मान करण्यात प्रशासन व्यस्त राहते. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांकडे अपेक्षेएव्हढे लक्ष देताना प्रशासनाची धावपळ, तारांबळ उडते. गर्दीचे प्रमाण पाहताच दिशादर्शक, मार्गदर्शक सूचनांच्या फलकांकडे दुर्लक्ष होते. अशावेळी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी प्रत्यक्ष स्वयंसेवक, पोलिस यंत्रणा कार्यरत ठेवून त्यांना गर्दी हाताळण्याच्या सूचना देणार्‍या अनुभवी मार्गदर्शक व्यक्तींची निवड करणे अधिक उपयुक्त ठरते.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
ध्वनिप्रदूषण रोखावे
 
कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगा हा धार्मिक प्रथेचा आवश्यक भाग नसल्याने धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषण करणार्‍या भोंग्याविरोधात कारवाई करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र राजकारणी मंडळी कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेऊन एक गठ्ठा मतांसाठी असले निर्णय ताटकळत ठेवतात. त्यामुळे असल्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येते. भोंग्यासारखेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे आपल्या सणांत देखील मोठमोठे कर्णकर्कश आवाजातील लाऊडस्पीकर, कानठळ्या बसवणारे डीजे, फटाक्यांची आतषबाजी यावरही निर्बंध घातले पाहिजेत. आज झपाट्याने देशात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. याचा राजकीय पुढार्‍यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. ध्वनि प्रदूषण करणारे भोंगे वेळीच उतरावेत. पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करुन कडक अंमलबजावणी करावी.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव
 
भाडेवाढ सुसूत्र असावी!
 
सहा, अकरा, एकवीस अशा सूत्रातून एस.टी महामंडळाच्या नव्या भाडेवाढीने प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या एक-एक रुपयावरून ‘तू तू, मैं मैं, वादावादीत मात्र खूपच वाढ झाली आणि हे ग्रामीण भागातून अधिक जाणवते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. खरेतर प्रवासी किंवा वाहक यापैकी कुणाचाही यात दोष नाही. कलह वाढतो तो महामंडळाने एक एक रुपयाच्या पटीत केलेल्या भाडेवाढीच्या सुत्रांमुळे जणू काही वादालाच निमंत्रण दिल्यासारखे झाले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. म्हणून या पार्श्वभूमीवर महामंडळाने भाडेवाढ सूत्रात सुधारणा घडवून आणावी असे वाटते.
 
विश्वनाथ पंडित, ठाणे.
 
महायुती एकसंघ राहावी
 
भाजपच्या मंत्र्यांच्या आपल्या खात्याच्या कार्यपद्धतीवर ठसा उमटवा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर काही सूचना केल्या आहेत. यामध्ये मंत्र्यांनी आपल्या खात्याचा आढावा कसा घ्यावा, विभागातील सुनावण्या प्रलंबित राहू नयेत यासाठी काय उपाययोजना कराव्यात, तसेच मतदारसंघातील कामे कशी मार्गी लावावीत, या बाबतचे वेळापत्रकच ठरवून दिले जाणार आहे. दर पंधरा दिवसांनी याचा आढावा घेऊन त्याचे प्रगतीपुस्तक तयार केले जाणार आहे. मंत्र्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष असणार आहे. या योजनेमुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. तसेच शिस्तबद्ध कामकाज सुरु राहील. आमदारांच्या कामाचा आढावा घेणे जरुरीचे आहे. भाजपच्या मंत्र्यांना जशी ही शिस्त लावण्याचा प्रयत्न होतो आहे, तसेच प्रयत्न महायुतीतील इतर पक्षाच्या मंत्र्यांनी करावेत. सरकार तीन पक्षाचे असल्यामुळे अशी व्यवस्था तिन्ही पक्षांनी करावी म्हणजे याला एकसंघ रूप येईल व महायुती म्हणून सरकार एकसंघ दिसेल.
 
शांताराम वाघ, पुणे   

Related Articles