गाझातील मशिदीवर इस्रायलचा हवाई हल्ला; १९ ठार   

दीरअल-बलाह (गाझा पट्टी) : एकीकडे हिजबुल्लाविरोधात कारवाई सुरू असताना  दुसरीकडे इस्रायलने गाझामध्ये हमासविरुद्धचे युद्धही सुरूच ठेवले आहे. रविवारी पहाटे इस्रायलने गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला केला. यात १९ जण ठार झाले. तर २० जण जखमी झाले. पॅलेस्टिनी रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. 
 
मध्य गाझा पट्टीतील दीर अल-बलाह येथील अल-अक्सा रूग्णालयाजवळील मशिदीत हा हल्ला झाला. विस्थापित नागरिक या मशिदीत आश्रय घेत असल्याचा संशय इस्रायलला होता. त्यातून इस्रायलने हा हवाई हल्ला केला. या मशिदीत युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त पॅलेस्टिनी नागरिक जमले होते. त्यामधील १९ जणांचा यात मृत्यू झाला. 
 
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १२०० लोकांचा मृत्यू झाला होता. तर २५० जणांना बंधक बनवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. 
 
दरम्यान, गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून सीमेवर इस्रायलशी गोळीबार करणार्‍या हिजबुल्लाविरोधात इस्रायलने लेबाननमध्ये नवी आघाडी उघडली आहे. गेल्या आठवड्यात तेहरानने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही इराणवरच हल्ला करण्याचा निर्धार केला आहे. इस्रायलने दक्षिण बैरूतमध्येही हल्ले वाढवले असून इराणसमर्थित दहशतवादी गटांविरोधात युद्ध तीव्र केले आहे. इस्रायलच्या स्थापनेच्या सुमारास १९४८ च्या युद्धातील दाट लोकवस्तीच्या निर्वासित छावण्या असलेल्या उत्तर गाझाच्या जबलियामध्ये लष्कराने पुन्हा हवाई आणि जमिनीवरील हल्ले सुरू करण्याची घोषणा केली आहे.

दक्षिण बैरूतमध्येही बॉम्बहल्ला

इस्रायलने हिजबुल्लाच्या दहशतवादी तळांवर शनिवारी रात्रभर बॉम्बवर्षाव केला.  दहिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या दक्षिण उपनगरात या हल्ल्याचे पडसाद उमटले. बैरूत विमानतळाकडे जाणार्‍या मुख्य महामार्गावरील गॅस स्टेशन आणि वैद्यकीय साहित्यासाठीच्या गोदामावर हे हल्ले करण्यात आले. रात्रभर स्फोटांची मालिका सुरू असल्याने हिजबुल्लाच्या दारूगोळा साठ्यावर हल्ला झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

Related Articles