बँक व्यवस्थापक कुलकर्णी यांच्या हत्येचे गूढ उकलले!   

हॉटस्पॉट न दिल्याने खून; बारा तासांत आरोपी ताब्यात 

पुणे : जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या बँक व्यवस्थापकाच्या हत्येचा उलगडा हडपसर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत केला आहे. हॉटस्पॉट न दिल्याने चारजणांनी बँक व्यवस्थापकाचा निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी तीनजण अल्पवयीन आहेत. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, हडपसर) असे मृत बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. या प्रकरणी विनायक रामचंद्र कुलकर्णी (वय ५१, उत्कर्षनगर सोसायटी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी मयूर भोसले (वय २०, रा. हडपसर, मूळ रा. फलटण) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री उत्कर्षनगर सोसायटीसमोरील पदपथावर घडली. 

त्या रात्री नेमके काय घडले?

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हडपसर गाडीतळ येथील उत्कर्षनगर सोसायटीत राहतात. ते फायनान्स कंपनी व बँकेचे काम करीत होते. सोमवारी रात्री दीड वाजता या सोसायटीसमोरील पदपथावर ते शतपावली करीत असताना चार अल्पवयीन मुलांनी त्यांना मोबाइलचे हॉटस्पॉट (वाय फाय) पाहिजे असल्याचे सांगितले. मात्र, वाय-फाय देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलांनी कुलकर्णी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. 

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा 

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजद्वारे चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस तपासात हॉटस्पॉट दिला नसल्याच्या कारणाने हत्याराने वार केल्याची कबुली दिली. आरोपीमध्ये एक आरोपी सज्ञान असून, तीन आरोपी १७ वर्षांचे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Related Articles