लांडग्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी   

उत्तर प्रदेशात उपद्रव वाढला

लखनौ : उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लांडग्यांचा उपद्रव सुरू आहे. लांडग्यांचे कळप मानवी वस्तीवर हल्ले चढवत असून अशाच एका हल्ल्यात पाच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.महसी तालुक्यात हल्ल्याची घटना घडली. सोमवारी मध्यरात्री हल्ला झाला होता, असे अधिकार्‍यांनी सांगितले. पंडाहिया गावात अफसाना (वय ५) झोपली होती. तेव्हा लांडग्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने तिच्या नरडीचा घोट घेतल्याचे स्पष्ट झाले. मानेवर त्याच्या दाताचे व्रण सापडले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अफसानाला ग्रामस्थांनी तातडीने महसी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. विविध विभागांचे अधिकारी आणि भाजपचे आमदार सुरेश्वर सिंह यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच त्यांनी ग्रामस्थांना आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगितले. 
 
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून लांडगे मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सात मुलांचा समावेश आहे. ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सीतापूर जिल्ह्यातही असेच हल्ले झाले आहेत. पिलभीत जिल्ह्यातील रामपूर येथे बिबट्याचा वावर आहे. पावसामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

वन्य प्राण्यांना पकडण्याचे आदेश 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये हल्ले होणार्‍या गावांत गस्त वाढविणे तसेच अधिक मनुष्यबळ वाढवण्यास सांगितले आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष तातडीने कमी व्हावा, यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मानवी वस्ती परिसरात शिरणार्‍या वन्य प्राण्यांना पकडण्याची मोहीम राबवावी, त्यांना पुन्हा जंगलात सोडावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच परिसराची पाहणी करून परतलेले वन मंत्री अरुण कुमार सक्सेना यांना अहवाल देण्यास सांगितले. त्यांनी नुकताच पिलभीत जिल्ह्यातील बिजनोर आणि मोरादाबादचा दौरा केला होता.
 

Related Articles