१६ जून ते २२ जून २०२४

 
उत्साह,आनंद वाढवणारी युती
 
शुक्राची बुधाशी होणारी मिथुन राशीतील युती हा या सप्ताहातील सर्वात महत्वाचा ग्रहयोग मानायला हवा. हे दोन्ही शीघ्रगती ग्रह असल्याने त्यांच्या योगाचा गोचर परिणाम फारच कमी काळ टिकणारा आहे. परंतु बुध-शुक्र युती जन्म कुंडलीत सुस्वभावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची  ठरते. बुध -शुक्र युती गोड बोलणार्‍या आणि हसतमुख असणार्‍या व्यक्तिमत्वाला जन्म देते. अशा व्यक्तींना  सतत आनंदी राहण्याची कला उत्तम प्रकारे अवगत असते. बरोबर वक्तृत्व, लेखन, कला अशापैकी एखाद्या गोष्टीत पारंगत असतात. या सप्ताहातील बुध-शुक्र युती बुधाच्या स्व गृही म्हणजेच मिथुन राशीत होत असल्याने या युती योगावर जन्म घेणारी बालके हरहुन्नरी, हुशार असून लेखन, पत्रकारिता, प्रकाशन, कॉमर्स अशा क्षेत्रात मोठे काम करू शकतील. सप्ताहात वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींना वाढता उत्साह, हास्यविनोद, लेखन किंवा कला या दृष्टीने काही शुभ फलिते अनुभवास येतील. या मोठ्या ग्रह योगासोबत चंद्राचे मंगळ, हर्शल, गुरु आणि रवी यांच्याशी होणारे प्रतियोग देखील महत्वाची भूमिका बजावतील. उंचावणार्‍या अपेक्षा आणि वाढता आत्मविश्वास, निर्णयाच्या बाबतीत केलेला उतावळेपणा आणि त्यातून झालेला अपेक्षाभंग अशी गोचर फलिते या प्रतियोगांच्या माध्यमातून विविध राशींना अनुभवास येतील.
 
मेष-कर्तृत्वाला पूरक घडामोडी
 
राशीतील मंगळ तुमची वृत्ती आग्रही ठेवेल. आपला हेका चालवण्याचे तुमचे वर्तन संबंधितांना नाराज करेल. विवाहेच्छूंना खुश करणार्‍या घडामोडी घडतील. कला आणि साहित्य यांचे आकर्षण वाढते राहील. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान अशा क्षेत्रात कर्तृत्वाला पूरक घडामोडी घडतील. मंगळवार अपेक्षित घडामोडींनी यशदायक ठरेल. गुरुवार कौटुंबिक आणि ऐहिक सुखावृद्धी करणार्‍या घटना घडवेल. पौर्णिमा विचारवंतांचा आणि राजकारण्यांचा नावलौकिक वाढवेल. सप्ताहांती अनोख्या व्यावसायिक संधींचा लाभ होईल.
 
वृषभ-प्रवास दगदगीचे होतील
 
व्यय स्थानातील मंगळ पायाला इजा करू शकतो किंवा डोकेदुखी देऊ शकतो. तरीही सप्ताहाचा प्रारंभ स्त्री सहवासाने सुलभ बनेल. दैनंदिन व्यवहारात आणि आर्थिक घडामोडीत सहजता येईल. कला आणि साहित्य प्रेमासाठी खर्च कराल. मंगळवार उपक्रमांना प्रयत्नांती यश देणारा आहे. हर्शल आणि नेपच्यून अंतःस्फूर्तीने बरेवाईट संकेत देत राहतील. उत्तरार्धातील पौर्णिमा खर्चाची आणि छोट्या कौटुंबिक प्रसंगातून अपेक्षाभंग करणारी आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवास दगदगीचे होतील.
 
मिथुन-नात्यातील भावनिक गुंतवणूक वाढवा
 
मंगळ नोकरी आणि उद्योगात मान वाढवणारा, परिश्रमाची ताकद देणारा आणि प्रयत्नांना यश देणारा आहे राशीतील शुक्र सकारात्मकता आणि उत्साह वाढविणारा, सुखाचे दिवस देणारा आहे. कपडे आणि इतर आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल. हर्शल आणि नेपच्यून उतावळेपणा वाढवणारे आणि क्वचित प्रसंगी अविचारी कृती करवणारे आहेत. गुरु भ्रमण नातेवाईकांपासून दूर घेऊन जाणारे आहे. नात्यातील भावनिक गुंतवणूक वाढवा. पौर्णिमा दैनंदिनीत अडथळे निर्माण करणारी आणि मनाविरुद्ध तडजोड करायला लावणारी आहे.
 
कर्क-मोठ्या जबाबदार्‍या पेलू शकाल
 
परिश्रमाची ताकद आणि आत्मविश्वास यांच्या सहाय्याने मोठ्या व्यावसायिक जबाबदार्‍या पेलू शकाल. ऐहिक सुखे आणि मौजमजा यांचे आकर्षण वाढेल. शनी भ्रमण कौटुंबिक सदस्यांच्या नाराजीचे प्रदर्शन करणारे आहे. हर्शल अंतःस्फूर्तीचा विलक्षण अनुभव देणारे तर नेपच्यून भ्रमण आध्यात्मिक साधकांना दृष्टांताची अनुभूती देणारे आहे. लाभ स्थानातील गुरु आपल्या सभोवतालचे जग चेतनामय बनवेल.  पौर्णिमा खर्चाची असली तरी तरी त्या खर्चातूनही आनंद निर्माण होईल.
 
सिंह-विविध क्षेत्रात धनलाभाचे संकेत
 
अनपेक्षित अडथळ्यांमुळे दैनंदिन कामांना विलंब होईल. नोकरीतील यश आणि प्रशंसेने नोकरदार खूष रहातील. तुमच्या कामांची योग्य प्रकारे दखल घेतली जाईल. साहित्य आणि कला क्षेत्रातील मंडळींना विशेष धनलाभ संभवतो. कौटुंबिक आघाडीवर सुख आणि समाधान राहील. छोटे छोटे राग-लोभ संसाराची गोडी वाढवतील. उत्तरार्धात स्वतःच्या व्यावसायिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. पौर्णिमा अपेक्षित घटना घडविणारी राहील.सप्ताहांती विविध क्षेत्रात धनलाभाचे संकेत लाभतील.
 
कन्या-सत्कृत्यांतून  मनःशांती
 
सप्ताहाच्या प्रारंभी डोक्याला दुखापत होणार नाही याची खबरदारी घ्या. काही जणांना डोकेदुखी सतावेल. संसारात तारतम्याने खर्च करण्याची आवश्यकता आहे. सरकारी कामांना विलंब होण्याची किंवा ती कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. नोकरदार चिकाटीने आणि संयमाने स्वतःचे कर्तव्य काटेकोरपणे पार पडतील. बुधवारी प्रवास टाळा, अनपेक्षित अडचणींनी दगदग होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात धार्मिक अधिष्ठान बळकट होईल. सत्कृत्ये मनःशांती देतील. सप्ताहाचा शेवट नोकरदारांसाठी अधिकार वृद्धीचा असला तरी जबाबदार्‍या वाढतील.
 
तूळ-चर्चेत अपशब्द टाळा
 
सप्तमातील मंगळ पती-पत्नीतील तीव्र मतभेदांचा निदर्शक आहे. विशेषतः महिलांना पतीच्या आग्रही भूमिकेचा सामना करावा लागेल. आपल्या चर्चेत अपशब्द टाळणे योग्य ठरेल. भागीदारी  व्यवसायात  शांत चित्ताने व विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी   आहार विहारात बदल करण्याची आवश्यकता आहे. सप्ताहांतीची  पौर्णिमा अडथळे निर्माण करणारी, विलंब दर्शक आणि तडजोड करायला लावणारी आहे. स्वतःची श्रद्धा डळमळीत होऊन देऊ नका.
 
वृश्चिक-कामात सहजता येईल
 
षष्ठ स्थानातील मंगळ दैनंदिन कामात सहजता आणेल. मेहनतीने स्वतःची उद्दिष्टे साध्य करत राहाल. कौटुंबिक आघाडीवर मौजमजा कराल. करमणुकीचा आनंद घ्याल. कला आणि साहित्य यातील अभिरुची वाढेल. मंगळवारी कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागेल. हर्शल आणि नेपच्यून कौटुंबिक प्रसंगातून भावनोद्रेक करणारे आहेत. सप्ताहाच्या उत्तरार्धात सप्तमातील गुरु स्वास्थ्य वाढवणारा असला तरी नोकरीत अधिकारी वर्गाला असहकाराचा सामना करवा लागेल. सप्ताहांती चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
 
धनु-प्रयत्नाने कार्यसिद्धी
 
मुलामुलींच्या योग्यायोग्य उपक्रमांची माहिती घ्या. लहान मुलांना उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता  आहे. कौटुंबिक आघाडीवर गैरसमजातून पती-पत्नीत रुसवे फुगवे होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे आरोग्य महत्त्वाचे राहील. मंगळवार नोकरदारांना कामात सहजता देणारा तसेच प्रयत्नाने कार्यसिद्धी करणारा राहील. गुरु भ्रमण स्वतःच्या जीवनशैलीच्या योग्यायोग्यतेचा विचार करायला लावणारे आहे. सप्ताहाच्या अंतीची पौर्णिमा कौटुंबिक अपेक्षाभंग करणारी तर संततीच्या अविचारी कृत्यांना आळा घालण्याचे संकेत देणारी आहे.
 
मकर-संतती इच्छूंना सुवार्ता
 
सप्ताहाचा प्रारंभ वास्तू आणि दुरुस्त्यांचे खर्च वाढवेल. मातेच्या किंवा मातेसमान व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आप्तेष्टांशी गैरसमज संभवतात. बौद्धिक क्षेत्रात तुमचा दबदबा कायम राहिला तरी कलात्मक व्यवसायात संघर्ष करावा लागेल. आर्थिक बाबतीत थोडे काटेकोर रहावे लागले तरी लहान मुलामुलींच्या प्रगतीचा आनंद अडचणी विसरायला लावेल. संतती इच्छूंना सुवार्ता मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अधिकार वृद्धी करणारा  उत्तम कर्तृत्वाची संधी देणारा आहे.
 
कुंभ-कष्ट आणि निर्धाराने उद्दिष्टपूर्ती
 
विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. तुमचे प्रयत्न, कष्ट आणि निर्धार तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाईल. तुमच्या कामात इतरांची उत्तम साथ संगत लाभेल. राशीतील शनी सावधानतेचे संकेत देत असला तरी ती सावधानता विलंबात परिवर्तित होऊ देऊ नका. शुक्राचे भ्रमण सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील प्रेमाचे संबंध वृद्धिंगत करणारे आहे.  जिव्हाळ्याच्या माणसांची साथ तुमच्या कार्यात सहजता आणेल. सप्ताहांतीची पौर्णिमा समाधान लाभण्यासाठी तडजोड करायला लावेल.
 
मीन-सुसंवादाने नवचैतन्य
 
उतावळेपणाने केलेले खर्च शेवटी नुकसानकारक ठरतील. कौटुंबिक जीवनातील निर्णय घाईने घेण्याचे टाळावे. माहिती तंत्रज्ञान, साहित्य, काव्य, कला, सौंदर्य किंवा जाहिरात अशा क्षेत्रात कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. घरातील सुसंवादाने वातावरणात नवचैतन्य येईल. हर्शल अंतःस्फूर्तीतून भलेबुरे संकेत देणारा आहे तर नेपच्यून भावनांचा कडेलोट करणारा आहे. उत्तरार्धातील पौर्णिमा कौटुंबिक सदस्यांच्या अपेक्षा उंचावेल तर सप्ताहाचा शेवट उंचावलेल्या अपेक्षांमुळे मानसिक स्थिती अस्थिर ठेवेल.

सन २०२४ नव्या वर्षाचे वार्षिक भविष्य

 
उदयराज साने : 7757051293
 
दि. 30 मे 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा शपथ घेतली. या शपथविधी कुंडलीत दि. 26।1।2022 पासून केतु दशा सुरू झाली. शपथविधी कुंडलीतील केतु धनु राशीत असून, धनु राशीचा अधिपती ग्रह गुरू हा वृश्‍चिक म्हणजेच प्लूटोच्या राशीत आहे व हा प्लूटो धनु राशीत वर्गोत्तम असा असल्याने आजपर्यंत पंतप्रधानांनी विरोधकांचे सर्व डावपेच हाणून पाडले. सांप्रत केतुच्या दशेत रवि अंतर्दशा व बुधाची विदशा संपून केतुत-रवि व रवित-केतु विदशाही 9।12।2023 ला संपली व आता केतुदशेत-रवि अंतर्दशा व शुक्राची विदशा सुरू असून, शपथविधी कुंडलीत व आपल्या स्वतःच्या (पंतप्रधानांच्या) कुंडलीत शुक्र हा मारकस्थानांचा अधिपती आहे. दि. 25 डिसेंबरला गोचर शुक्र वृश्‍चिकेत प्रवेश करेल.
 
पंतप्रधानांची स्वतःची सध्या राहुची दशा सुरू असून, दि. 8।8।2023 ला राहुत-गुरू संपली त्यानंतरच्या विदशांचा विचार करता त्याअगोदर राहुत-गुरू संपून शनिची दशा(अंतर्दशा) सुरू झाल्याचे दिसून येते. राहुत-शनि व शनि विदशा 20।1।2024 ला संपेल व त्यानंतर राहुत-शनि-बुध विदशा 15।6।2024 ला संपेल यात नवी लोकसभा अस्तित्वात येईल.
 
पंतप्रधानांच्या कुंडलीचा विचार करता शुक्र हा मारकेश व बुध हा अष्टमेश आहे. म्हणूनच पुढील ग्रहयोग जास्त गांभीर्याने घ्यावे लागतात. मीन राशीत नेपच्यूनचे आगमन झाले व त्याच ठिकाणी गोचर राहुही भ्रमण करत असल्याने जानेवारी पासून ते दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोचर हर्षल पंतप्रधानांच्या मूळ कुंडलीतील नेपच्यूनच्या षडाष्टकातून जाणार आहे. गोचर राहु हा पंतप्रधानांच्या मूळ कुंडलीतील नेपच्यूनच्या प्रतियोगात असणार आहे. शनिचे गोचर भ्रमण कुंभ राशीतून सुरू असून, हा गोचर शनि पंतप्रधानांच्या पत्रिकेतील चंद्राच्या केंद्र योगातून जात असल्याने त्यांचा दबाव वाढविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. शपथविधी कुंडलीतील केतु दशेतून चंद्राची अंतर्दशा व विदशा 17।1।2024 पर्यंत आहे व त्यानंतर मंगळ विदशा येत असल्याने आपण त्याचा प्रथम विचार करू. आता धनु या अग्निराशीतून हे मंगळ भ्रमण होत असून, त्यांना चांगली ऊर्जा पुरवत आहे. हा गोचर मंगळ 30।1।2024 पर्यंत धनुराशीत राहणार असल्याने विरोधकांना पंतप्रधान चांगलेच प्रत्युत्तर देत राहणार आहेत. दि. 5 फेब्रुवारी 2024 ला मंगळ मकर राशीत येत असल्याने ही भांडणे आणखी वाढत जाणार आहेत. या मंगळ विदशेनंतर केतुत-चंद्र व चंद्रात राहु विदशा सुरू होईल. यामुळेच पंतप्रधानांनी संपुर्ण फेब्रुवारी महिन्यात काळजी घेणे गरजेचे आहे कारण गोचर रवि हा कुंभ राशीत प्रवेश करतो व या रविचे भ्रमण शनिवरून होणार असले तरी पंतप्रधानांच्या कुंडलीतील गुरू (मूळ कुंडलीतील) वरूनही हे रवि भ्रमण होणार असल्याने पंतप्रधानांना त्याचे संरक्षण मिळणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यास रवि-शनि युतीयोग होत असून, दि. 23 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024 पर्यंत हा युतीयोग सुरूच राहणार असल्याने अनेक प्रकारच्या अडचणींनी त्यांना ग्रासले जाणार आहे. पक्षातसुद्धा मोठे मतभेद उघडपणे समोर येणार आहेत. भाजपाच्या पत्रिकेत गोचर मीन राशीतील राहु भ्रमण हे रविवरून होत असून, फेब्रुवारीच्या मध्यानंतर रविला ओलांडून राहु हा मागे येणार असल्याने त्यानंतर मात्र पक्ष व पंतप्रधानांना शपथविधी कुंडलीनुसार केतुत-चंद्र व चंद्रात गुरूची विदशाही असल्याने पूर्वीप्रमाणेच ते अग्रेसर होत असल्याचे यातील शनिची विदशा चांगली जाणार असून, बुध या विदशा त्यानंतरच्या असल्याने यातील शनिची विदशा चांगली जाणार असून, बुध विदशा संमिश्र फळे देताना आढळते. पंतप्रधानांनी म्हणूनच स्वतःची संपूर्ण काळजी घेणे गरजेचे असून, इतकेच म्हणावेसे वाटते राजा रात्र वैर्‍याची असून जागा राहा.
 
मेष- उत्कर्षदायक वर्ष
 
मेष राशीला 2024 चे वर्ष जीवनातील प्रत्येक पातळीवर शुभ असल्याचे दिसून येते. 2014 ला गोचर शनि हा 11 अंशा पासून 20 अंशापर्यंत कालक्रमण करणारा आहे. गोचर राहु हा डिसेंबर 2024 ला सात अंशापर्यंत मागे मीन राशीत येणार आहे. गुरू हा मेष राशीतून वृषभ राशीत 1 मे 2024 ला येत असून, डिसेंबर अखेरपर्यंत तो वृषभ राशीतच 19 अंशावर येत आहे. उर्वरित हर्षल हा ग्रह 1 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करतो व पुन्हा दि. 13 डिसेंबरला हर्षल हा वक्री अवस्थेत पुन्हा मेष राशीत प्रवेश करतो. बाकीचे ग्रह आपल्या नियोजित काळापर्यंत राशीबदल करत राहतील. मेष राशीला नवे वर्ष आपल्या मनोकामना पूर्ण करण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. शिक्षण-पर्यटन, आर्थिक स्तर या सर्व गोष्टींसाठी पूर्ण चांगले आहे. उपवर मुला-मुलींचे लग्नाच्यासाठीसुद्धा नवे वर्ष संपूर्ण चांगले आहे. नोकरीत बढती-प्रतिष्ठा-विदेश गमनासाठी प्रसिद्धी अगदी सामान्य कुंडल्यातूनसुद्धा कामे सहजगत्या पार पडणार आहेत. आपला शत्रू नव्या वर्षात कुरघोडी करण्याचा प्रयत्न निश्‍चित करणार असले तरी त्यात त्यांना फारसे यश जूनच्या शेवटापर्यंत मिळणार नाही. त्यानंतर मात्र थोडा फार त्रास त्यांच्याकडून होईल; पण अंतिम विजय आपलाच असेल. शिक्षणासाठी-नोकरीसाठी जरूर प्रयत्न मेष राशीच्या लोकांनी करावेत. त्यांना ग्रहांचा पाठिंबा निश्‍चितपणे मिळेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे.
 
वृषभ-उत्तरार्ध चांगला
 
वृषभ राशीला गुरू हा बारावा 30 एप्रिल 2024 पर्यंत राहणार असल्याने जरी गुरुबळ जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी लागत असले तरी हे गुरुबळ 1 मे 2024 ला गोचर गुरु वृषभ राशीत येईल तेव्हाच मिळणार आहे. वृषभ राशीला नव्या वर्षात गोचर शनि व राहु यांची चांगली मदत होणार आहे. हर्षल हा वृषभ राशीत 1 जूनपासून येत आहे व पुढे हा हर्षल पुढील वर्षीच्या दि. 13 डिसेंबर 2024 ला पुन्हा बारावा होणार आहे. इतर सर्व ग्रह नेहमीप्रमाणेच वेळोवेळी बदलत राहणार आहेत. 2024 ला वृषभ राशीला व्यापार-व्यवसाय नोकरी यासाठी संपूर्ण चांगले असून, त्यात उत्तम प्रगती करणे सहज शक्य होणार आहे. प्रवास-आर्थिक स्तरावर ग्रहमान चांगले असून, आपल्यावर कर्ज असेल तर नव्या वर्षात हे कर्ज कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यास त्यात यश मिळू शकते. वृषभ राशीचे लोक जरी धार्मिक नसले तरी नव्या वर्षात आपण नित्यनेमाने एखादी उपासना सुरू केल्यास त्यातून आपणास समाधान निश्‍चितपणे मिळणार आहे. कौटुंबिक स्तरावर आपले खर्च वाढणार असल्याने आपण थोडे अस्वस्थ होणार असला तरी हा वाढलेला खर्च आपणास नंतर बरेच काही देऊन जाईल. मुला-बाळांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला आपणच खतपाणी घातल्यास त्यांना त्यांच्या भावी जीवनाचा पाया चांगला रचता येईल. कोर्ट-कचेरीची सर्व कामे आपण जूनपर्यंत पुढे ढकलावीत. आरोग्याच्या स्तरावर मेपासून आपले आरोग्य सुधारेल. एकूणच नवे वर्ष आपल्याला विविध पातळ्यांवर चांगले जाईल.
 
मिथुन-नवे वर्ष प्रगतिपथावर
 
2024 च्या नव्या वर्षात भाग्यातून होणारे शनिभ्रमण राशीच्या दशमस्थानातून भ्रमण करणारे राहु-नेप. व राशीच्या लाभस्थानातून मार्गी होणारा गुरू व तेथेच ठाण मांडून बसलेला हर्षल या सर्व आशादायक ग्रहस्थितीमुळे नवे वर्ष मिथुन राशीच्या स्त्री-पुरुषांना प्रगतिपथावर ठेवणार आहे. नव्या वर्षात राशीच्या चतुर्थातील केतु व राशीला आठवा गोचर प्लूटो आपणावर मोठी संकटे जरी आणण्यास सक्षम असला तरी गोचर शनि-गुरूमुळे या संकटातून आपण सहजपणे निभावले जाल. नवे घर घेण्यास नवे वर्ष जूनपर्यंत अनुकूल नसले तरी त्यानंतर मात्र अनुकूलता मिळू शकते. उपवर वधू-वरांना नवे वर्ष विवाहबंधनात अडकवून घेण्यासाठी संपूर्ण चांगले आहे. नोकरदार व व्यापारी तसेच घरगुती किरकोळ व्यापारी वर्गाने नव्या वर्षात आपली व्यावसायिक गुंतवणूक क्रमा-क्रमाने वाढवित न्यावी म्हणजे त्याचा ताण येणार नाही. तसेच जानेवारी 15 नंतर व मे 16 नंतर एकंदर परिस्थितीपासूनच गुंतवणूक करावी म्हणजेच नवे वर्ष आर्थिक स्तरावर फारसे वाईट जाणार नाही. राशीच्या योगकारक शुक्राचे नव्या वर्षात एक नियमित भ्रमण असल्याने फारसा त्रास होणार नाही. आरोग्याच्या स्तरावर नवे वर्ष सर्वसाधारणपणे बरे जाणार आहे. मिथुन राशीचे लोक जास्त विचार करून आपले आरोग्य बिघडवून घेत असतात. यासाठी असा व्यावहारिक जास्त विचार करून प्रकृती बिघडवून घेण्यासाठी भगवान श्री शंकराची उपासना केल्यास आपला त्यात दुहेरी फायदा होणार आहे. एकूणच नव्या वर्षात मिथुन राशीच्या लोकांना नवे वर्ष चांगली प्रगती साधून देऊ शकतो.
 
कर्क-प्रवासातून फायदा
 
2024 च्या नव्या वर्षात कर्क राशीच्या सर्व स्त्री-पुरुषांना गोचर शनि जरी राशीला आठवा असला तरी गुरू-राहु-नेपच्यून-हर्षल यांच्या पार्श्‍वभूमीवर संकटातून सुखरूप सुटका करून देणारे असून, नोकरदार लोकांनी बदली स्वीकारून आपल्या कामाच्या ठिकाणी हजेरी लावल्यास तर इतर होणार्‍या त्रासातून आपली सुटका सहजपणे होऊ शकते. म्हणूनच बदलीच्या ठिकाणी हजर राहिल्यास नवा प्रमोशन मार्ग मोकळा होऊ शकतो. यासाठीच ही बदली स्वीकारणे गरजेचे ठरणार आहे. तसेही नव्या वर्षात लहान प्रवासाचे योग वारंवार येऊ शकतात, या प्रवासातून आपणास आनंद मिळणार आहे. नोकरदार लोकांना म्हणूनच आपल्या मानसिक मनोरचनेत थोडा बदल केल्यास आपला चांगला फायदा होताना दिसेल. हे सर्व घडत असता थोडी दगदग जरी होणार असली तरी अंतिम यशासाठी ते करावेच लागणार आहे. कर्क राशीच्या सर्व व्यापारी बंधुंनी राशीच्या दशमस्थानातील गुरू-हर्षलचा फायदा उठविण्यासाठी थोडे धाडस दाखविल्यास, आपले व्यावसायिक ज्ञान पणाला लावल्यास त्यात आपणास यश मिळू शकते. मात्र राशीला आठवा शनि असल्याने आपणास मोठे धाडस दाखविता येणार नाही व तेच योग्य असेल. उपवर मुला-मुलींसाठी नवे वर्ष विवाहबंधनाच्या दृष्टीने मे 2024 पासून संपूर्ण चांगले असून, आपण अगोदरच त्याची शॉर्टलिस्ट तयार करून ठेवावी म्हणजे मे नंतर निर्णय घेणे सोपे होणार आहे. कर्क राशीला आरोग्याच्या दृष्टीने मात्र गोचर बुध नव्या वर्षात अग्निराशीतच वक्री होत असल्याने आपले पथ्य हे काटेकोर पाळणे गरजेचे आहे. कारण शनि-बुध-केतु आपले आरोग्य वारंवार बिघडवू शकतात. हे लक्षात ठेवावे. एकूणच नवे वर्ष हे प्रगतीचे असले तरी मध्ये आरोग्य बिघडविणार असल्याने खबरदारी घ्यावी.
 
सिंह-आकर्षक प्रगती होईल
 
2024 चे नवे वर्ष सिंह राशीच्या स्त्री-पुरुषांना अत्यंत आकर्षक अशी प्रगती साधून देण्यासाठीच राशीच्या भाग्यस्थानात गुरू-हर्षल असून, त्याला मंगळ व शुक्राची जोरदार साथ मिळणार असल्याने काळजी करू नका. राशीला सातवा शनि व आठवा राहु-नेपच्यून जरी असले तरी भागीदारीच्या व्यवसायातील लोकांनी मात्र या अवघड ग्रहस्थितीला सामोरे जाताना आपल्या भागीदाराला थोडे जास्त स्वातंत्र्य दिल्यास त्यातून आपला फायदाच झाल्याचे निदर्शनास येईल. व्यापारी  लोकांनी कुठेही धोका पत्करू नये. गुरू-हर्षल आपणास तोटा होऊ देणार नाहीत हे मात्र खरे. नव्या वर्षात गोचर बुध हा अग्निराशीतच वक्री होणार असल्याने त्याचाही आपणास चांगला लाभ उठविता येईल. सातवा शनि हा विलंबी फळे देणार असला तरी संपूर्ण तापदायक हा शनि निश्‍चितच नाही. राशीला आठवा राहु हा सातत्याने भय निर्माण करणारा असल्याने आपल्या साहसी स्वभावावर थोडी बंधने हा आणणारा आहे. मात्र यामुळे आपल्यातील संयम वाढणार असून, हा भागही सर्वस्वी चांगला ठरणार आहे. उपवर मुला-मुलींना जूनपर्यंत आपणास लग्नाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार असून, आपला विवाह उरकता येईल. नव्या वर्षात सिंह राशीच्या सर्वच लोकांना आपल्या आरोग्याची काळची सर्वतोपरी घ्यावी लागणार आहे. सातवा शनि, आठवा राहु आपणास या गोष्टीची आठवण करून देणार असून आपला संयम व उपासना वाढवित नेल्यास यातून आपणास लीलया मात करण्यात यशस्वी होता येईल. एकूणच एक आरोग्य सोडल्यास जीवनातील सर्व गोष्टीत गोचर गुरूची चांगली साथ मिळणार असल्याने नव्या वर्षात भरघोस प्रगती करणे सहज शक्य होणार आहे.
 
कन्या-उत्तरार्ध चांगला
 
2024 च्या नव्या वर्षात वर्षाच्या प्रारंभी गुरू मार्गी होत असल्याने नव्या वर्षात आता आपली कामे होणार आहेत. गेल्या वर्षी रखडलेली कामे आता अगोदर करून घ्या. गुरू हा 1 मेला वृषभ राशीत आल्यावर या सर्व कामांना जोरदार गती मिळणार आहे. नव्या वर्षात शनिचा मेपासून, गुरूचा व 1 जूनपासून हर्षलचा चांगला पाठिंबा मिळणार असल्याने नवे वर्ष सर्व तर्‍हेने प्रगतीचे जाणार आहे. राशीला राहु सातवा आल्याने काही काळापुरते जरी आपली कोंडी राहणार असली तरी नोकरदार-व्यापारी यांना सावधपणेच आपले काम करावे लागणार आहे. नव्या वर्षात चंद्र व मंगळाचे भ्रमण नियमित होणार असल्याने कोणतीही काळजी आर्थिक स्तरावर करू नका. कलाकारांना नव्या वर्षात नवीन करार-मदार करण्यास हरकत नाही. त्यातून आपणास चांगली प्रसिद्धी निश्चितपणे मिळणार आहे. लहान व्यवसाय करणार्‍या सर्व लोकांनी मेनंतरच आपले व्यवसायातील भांडवल वाढवावे म्हणजे तोटा होणार नाही. अगोदर सर्व बाजूंनी व्यवसायाचा सांगोपांग विचार करून त्यात सकारात्मक बदल कोठे करता येतील हे समजून घेऊन तसे बदल मात्र मेपासून करावे. उपवर वधू-वरांनी मेनंतरच आपणास विवाह करता येईल हे लक्षात घ्यावे. तोपर्यंत मात्र नुसती बोलणी करण्यास हरकत नाही. मे नंतर लांबच्या प्रवासाचे जर आपण बेत आखलेत तर कोणतीही अडचण येणार नाही. नवे काही शिकण्यासाठी संपूर्ण वर्ष आपणास चांगले असून त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करावेत. शेअर्समध्ये जे लोक सक्रिय असतील त्यांनी जूनपासून थोडा धोका पत्करला तर चालू शकेल. आरोग्याच्या स्तरावर नवे वर्ष मेपासून संपूर्ण चांगले असून मेपर्यंत मात्र सातवा राहु, आठवा गुरू-हर्षल प्रकृतीच्या कुरबुरी सुरूच ठेवू शकतो. यामुळे काटेकोरपणे आपला आहार व त्यातील नियमितता याचे पालन करावे.
 

(उर्वरित सहा राशींना नवे वर्ष कसे याचा आढावा आपण पुढील भागात घेणार आहोत.)