वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी पकडली   

बंदूक, काडतुसे जप्त्

रत्नागिरी : वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फिरणार्‍या आठ जणांना  बंदूक, जिवंत काडतूसे व इतर मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. संगमेश्वर तालुक्यातील मासरंग भागात हे शिकारीसाठी आले होते.दशरथ दिलिप बारगोडे (वय ३९, रा. पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी), विजय भिकाजी पाचकुडे (४२, रा. शेनवडे), सुभाष दाजी बोबळे (५०, रा. शेनवडे, चिलेवाडी), गणेश गंगाराम लाखण (३२, रा. शेनवडे, खालचीवाडी), सत्यवान सिताराम जोगळे (३८, रा. शेनवडे), रमेश सिताराम लाखण (४३, रा. शेनवडे खालचीवाडी), सुरेश मोळू जोगळे (३८, रा. शेनवडे जोगळेवाडी), दिलिप रामचंद्र बारगोडे (रा. पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी) या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना मासरंग -शेनवडे भागात एक पिकअप वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही पिकअपची थांबवून त्यामध्ये असलेल्या आठ जणांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शिकारीसाठी जात असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बंदूक, काडतूसे, विजेच्या सहा बॅटर्‍या, पिकअप असा एकूण २ लाख ५७ हजार २५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर ६५/२०२५, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम, ३/२५,३० भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles