उजनीचा पाणीसाठा घटला   

शेतकर्‍यांची वाढली चिंता 

इंदापूर, (प्रतिनिधी) : पुणे-नगर-सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. यामुळे पुढील दोन महिने अडचणीचे ठरणार आहेत. उजनी बैंक वॉटर क्षेत्रात पाणी खाली चालल्याने केबल व पाइपलाइन वाढविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झालेली आहे.
 
सोलापूर व नदीकाठच्या गावांना भीमा नदीतून पाणी सोडल्याने दररोज एक टीएमसी पाणी घटत आहे. नदीतून सोडण्यात आलेले पाणी १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. सध्या धरणात केवळ सहा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ११. ८० टक्के राहिली असून, गतवर्षी वजा ३८.८८ टक्के पाणी पातळी खालावली होती. साधारणपणे एप्रिलअखेर ते मे पहिल्या आठवडचात उजनी मृत साठ्यात जात असते. गतवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने. उजनी २१ जानेवारी २४ रोजी मृत साठ्यात गेले होते. 
 
सध्या भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी २० एप्रिलपर्यंत चालणार असून, त्यानंतर मुख्य कालवा वगळता इतर पाणी योजना बंद होणार आहेत, तर मुख्य कालवा १५ ते २० मे पर्यंत चालणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली. १३ एप्रिल २५ रोजी ११ टक्के पाणी पातळी आहे. गत वर्षीचा तुलनेत ५०.६८ टक्के पाण्याचा अधिक वापर झाला आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पाळी देण्यात आली नव्हती. भीमा नदीद्वारे सोडण्यात आलेल्या तीन पाळ्यांत १८ ते २० टीएमसी पाण्याचा वापर होतो. डिसेंबर, फेब्रुवारी व त्यानंतर ८ एप्रिल असे तीन पाळ्यांत धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यानंतर आषाढी वारीला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते.
 
पुढील दोन महिने शेतकर्‍यांसाठी काळजीचे
 
उजनीत सध्या ६.३२ टीएमसी उपयुक्त पाणी साठा असून पावसाळा आणखी दोन महिने लांबणीवर आहे. पावसाळा लांबल्यास दोन महिने शेतकर्‍यांसाठी चिंतेचे असणार आहेत. उजनी धरणातून आतापर्यंत विविध तरतुदीतून उपयुक्त ४७ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणात सध्या एकूण ६९ टीएमसी पाणी साठा शिल्लक राहिलेले आहे. ६३.६६ टीएमसी मृत साठ्यात धरले जाते.

Related Articles