काकांना विश्वासात घ्यावेच लागते...   

बारामती, (प्रतिनिधी) : काकांना विश्वासात घ्यावेच लागते, त्याशिवाय पुढे काही चालत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.बारामतीमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. ते ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
 
पवार म्हणाले, काका कुतवळ यांना मी या रस्त्याबाबत सांगितले आहे. त्यांना म्हणालो सहकार्य करा. याशिवाय मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांना देखील आदेश दिले आहेत. मी त्यांना म्हटले, काकालाही विश्वासात घ्या. काका लोकांना विश्वासात घ्यावे लागते. त्याशिवाय पुढे काही चालत नाही. काका लोक म्हणजे काका कुतवळ नाहीतर माध्यमे लगेच चर्चा करतील, अजितदादा घसरले. कोणावर घसरले यावर चर्चा होईल.
 
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. योजना करणे आमचे काम आहे. परंतु, त्याचा मेंटेनन्स करणे हे तुमचे काम आहे, ते व्यवस्थित झाले पाहिजे, असेही अजित पवारांनी म्हटले. पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे अत्याधुनिक साधनाचा वापर करुन शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्यावतीने करण्यात येणार्‍या पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करण्याकरीता निधीची गरज असते, त्यामुळे नागरिकांनीही नियमितपणे पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

Related Articles