घोडेगाव परिसरात डीजेचा दणदणाट   

मर्यादेपलीकडील आवाजामुळे नागरिक हैराण

भीमाशंकर (वार्ताहर) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून जिकडे, तिकडे डीजेची धूम ऐकायला मिळत आहे. घोडेगाव बाजारपेठ, चौकावर, रस्त्यांवर व मंगल कार्यालयात मर्यादा पलीकडे गोंगाट करणार्‍या डीजेचा आवाज व लेझर बीम लाईटींगच्या झगमगाटामुळे घोडेगाव परीसरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. ध्वनी प्रदूषण बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाने पर्यावरण, ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याला दररोज पायदळी तुडविले जात असताना पोलीस विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.  
 
घोडेगाव शहरातील बाजारपेठ, कुंभार गल्ली ते दत्त मंदिर मार्ग, ग्रामीण रुग्णालय, अहिल्याबाई होळकर मार्ग ते पोलीस ठाणे मार्गांसह घोडेगाव ते डिंभे पर्यंत अनेक मंगल कार्यालय, लाँन्स आहेत. या भागातून लग्नतिथीला मार्गक्रमण करत असताना डिजेच्या आवाजाने सर्वांचीच छाती धडधडते. यामध्ये स्थानिक नागरिकांचे तर हाल न विचारलेलेच बरे. कुणाच्या घरात रूग्ण अथवा बालक असल्यास विनंती सूचना होतात. परंतु त्यादेखील कित्येवेळा वादाचे निमित्त ठरतात. डी.जे. ध्वनिक्षेपक यांचा कानठळया बसवणारा दणदणाट मानसिक ताणासोबत तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, ह्रदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरत आहे. तसेच लेझर बीम लाईट पडल्याने अनेक व्यक्तिंच्या डोळयाचा पडदा तसेच बुबुळाला ईजा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. मात्र घोडेगाव परीसरात याचा वापर सर्रास केला जात आहे. 
 
सध्या या डीजेंवर कसलीही कारवाई होत नाही. विनापरवानगी डीजे वाजविले जातात. लेझर बीम लाईटचा झगमगाट होत आहे. मागील वर्षी घोडेगाव पोलीसांनी डीजे व डीजे मालकांवर कारवाई केली. मात्र डीजे जप्त केला नाही. धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखविल्या जाईल. मंगल कार्यात विघ्न निर्माण होईल असे तर्क देऊन पोलीस विभाग संबंधित व्यक्तिविरूध्द कारवाई पासून हात झटकून घेताना दिसतात.

Related Articles