नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात   

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर नगर रस्त्यावर सोमनाथ नगर चौक ते खराडी जुना जकात नाक्या दरम्यानची बीआरटी काढण्यास महापालिकेने शनिवारी रात्री पासून सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्यात वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारी बीआरटी काढल्यानंतर टप्याटप्याने उर्वरित मार्गावरील बीआरटी काढण्यात येणार आहे. 
      
वाहतूक कोंडी आणि सातत्याने होत असलेल्या अपघाताना कारणीभूत ठरणारी अर्धवट बीआरटी तत्काळ काढावी, अशी मागणी वडगाव शेरीचे माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गत आठवड्यात केली होती. त्यानंतर पवार यांनी लगेचच महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांना ही बीआरटी काढून टाकण्याचे आदेश दिले होते.महापालिका प्रशासनाने शनिवारी अर्धवट बीआरटी काढण्यास सुरवात केली. सोमनाथ नगर ते खराडी जुना नाका हे जवळपास तीन किमीचा बीआरटी मार्ग आहे. 
 
पहिल्या टप्प्यात सोमनाथनगर चौक आणि खराडी बायपास चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारा बीआरटी मार्ग आणि बस स्टॉप हटविण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. हा मार्ग काढल्यानंतर पुढच्या टप्यात उर्वरित बीआरटी मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, माझ्या अनेक दिवसांच्या प्रयत्नाना यश येत आहे. 
 
नगर रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्याचे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात येरवडा ते विमान नगर चौक बीआरटी मार्ग काढण्यासाठी राज्याच्या विधी मंडळात आवाज उठविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारी बीआरटी काढली. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली. आता उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता उर्वरित बीआरटी काढण्यास सुरवात झाली आहे. मी महापालिका प्रशासनाचा आभार व्यक्त करतो असेही माजी आमदार टिंगरे म्हणाले. 
 
• बीआरटी काढल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून  शिरूर ते वाघोली दरम्यान जो दुमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे, तो वाघोलीपर्यंत न करता तो थेट विमाननगरमधील फिनिक्स मॉलपर्यंत करण्यात यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तो मंजूर करण्यासाठीचा पाठपुरावा कायम राहिल, असे माजी आमदार टिंगरे यांनी सांगितले. 

Related Articles