पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच   

पुणे : अनेकदा प्रवाशांना पीएमपी बस थांबा कुठे आहे, याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. शिवाय पीएमपीचे प्रवासी देखील कमी होतात. याबाबतच्या अनेक तक्रारी सुध्दा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून थांबा असलेल्या ठिकाणी नव्याने ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 
 
शहरात अनेकदा रस्त्याची कामे करताना पीएमपीने बस थांब्याची लावलेली पाटी काढली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा पाटी लावली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस कुठे थांबणार आहे, याची कल्पना  नसते. नेहमीच्या प्रवाशांना बस कुठे थांबतात, याची माहिती असली तरी नवीन प्रवाशांना नसते. त्यामुळे बहुतांश प्रवाशांची बस आल्यानंतर चांगलीच धावपळ होते. हे सर्व टाळण्यासाठी बस थांबा असलेल्या ठिकाणी ’थांबा पाटी’ लावण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एका बसमधून संबंधित विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागांत फिरून पाटी आहे की नाही, याची पाहणी करतील. त्यानंतर जिथे पाटी नाही, तिथे पाटी बसवण्याचे काम केले जाणार आहे. 
 
पाटीवर असेल बसमार्ग 
 
ज्या ठिकाणी बसच्या थांब्याला शेल्टर आहे. तिथे पाटीची आवश्यकता नाही. मात्र, ज्या ठिकाणी शेल्टर नाही. तिथे ही पाटी लावली जाणार आहे. त्यावर त्या रस्त्याशी जोडलेले मार्गाचे क्रमांक लिहिले जातील. त्यावरून प्रवाशांना कोणत्या मार्गाची बस येथे थांबेल याची माहिती मिळणार आहे.

Related Articles