गुजरातमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; ३ मुलांची प्रकृती गंभीर   

अहमदाबाद : गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील वडाली येथे शेतकरी कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारांसाठी मुलांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तथापि, कुटुंबाने हे पाऊल का उचलले? हे अद्याप उघड झालेले नाही.विनुभाई सागर (४२), त्यांची पत्नी कोकिलाबेन (४०) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर भूमिकाबेन (१९), नीलेशभाई (१८), नरेंद्र कुमार (१७)  या तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे. हे कुटुंब 
  
 वडालीच्या सागरवास येथे राहून शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी सकाळी शेजार्‍यांना सर्वजण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णवाहिकेतून वडाळी येथील प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. यानंतर त्यांना इडरमधील पंचम रुग्णालयात आणि नंतर हिंमतनगर सरकारी रुग्णालयात हालविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान विनुभाईंचा मृत्यू झाला आणि नंतर रात्री कोकिलाबेन यांचे निधन झाले. तिन्ही मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अहमदाबादला नेण्यात आले आहे.इदरचे पोलिस उपअधीक्षक स्मित गोहिल म्हणाले, आतापर्यंतच्या तपासात कुटुंबाने हे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही. मृत विनुभाई यांचा मोबाइल एफएसएलमध्ये पाठवण्यात आला आहे. कुटुंबाच्या आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.

Related Articles