मुंबईचा दिल्लीविरुद्ध रोमहर्षक विजय   

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा संघ रविवारी रात्री आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्लीविरुद्ध  मुंबईच्या संघाने १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. मुंबईच्या गोलंदाजांनी अंतिम ४ षटकांत दिल्लीचे ६ फलंदाज बाद करत विजय खेचून आणला.  
 
या सामन्याआधी दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने २० षटकांत २०५ धावा केल्या. आणि दिल्लीच्या संघाला २०६ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. दिल्लीचा संघ १९ षटकांत फक्त १९३ धावा करू शकला.
 
मुंबईकडून फलंदाजी करताना मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक साकारले. तिलक वर्मा याने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. यावेळी त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.   मात्र त्याआधी सलामीवीर रोहित शर्मा याने १२ चेंडूत १८ धावा केल्या. यावेळी रोहित शर्मा याने १ षटकार आणि २ चौकार मारले. मात्र त्याला विपराज निगम याने शानदार गोलंदाजी करत पायचित बाद केले. रायन रिकल्टन याने दुसर्‍या क्रमांकावर येत २५ चेंडूत ४१ धावा केल्या. यावेळी त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादव याने मात्र निराशा केली. त्याने २८ चेंडूत फक्त ४० धावा केल्या. आणि त्याला कुलदीप यादव याने मिचेल स्टार्क याच्याकडे झेलबाद केले.त्याच्यानंतर लगेचच हार्दिक पांड्या हा अवघ्या २ धावा करून तंबूत माघारी परतला. 
 
विपराज निगम याने चकविणारा चेंडू टाकत स्टब्जकडे त्याला झेलबाद केले. त्यानंतर नमन धीर याने नाबाद ३८ धावा केल्या. विल जॅक याने देखील नाबाद १ धाव काढली.  दिल्लीच्या संघाकडून फलंदाजी करताना करूण नायर याने ८९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक वाया गेले. अभिषेक पोरेल ३३ धावांवर बाद झाला. मात्र बाकी फलंदाज जास्त काळ मैदानावर तग धरू शकले नाहीत. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
मुंबई इंडीयन्स : तिलक वर्मा ५९, रोहित शर्मा १८, रिकलटन ४१, सूर्यकुमार यादव ४०, हार्दीक पांड्या २, नमन धीर ३८, विल जॅक १ एकूण २० षटकांत २०५/५
दिल्ली कॅपिटल्स : करूण नायर ८९, अभिषेक पोरेल ३३, के.एल राहुल १५, अक्सर पटेल ९, स्टब्ज १, अशुतोष शर्मा १७, विपराज निगम १४, मिचेल स्टार्क १, कुलदीप यादव १ एकूण : १९ षटकांत १९३/१०

Related Articles