करंदीमध्ये तीव्र पाणीटंचाई   

तीन गावांकडून टँकरची मागणी

भोर, (प्रतिनीधी) :  पुणे-सातारा महामार्गावरील कंरदी खेडे बारे येथील जलस्त्रोत आटल्यामुळे मागील महिन्यापासून गावात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई सुरू झाली आहे. या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही कंरदी खेडे बारे, साळवडे व वारवंड या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टँकरची मागणी केली असल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने दिली. साळवडेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
 
कंरदीमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्यामुळे आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम रखडल्यामुळे काही वर्षापासून लोकांना दरवर्षी तिव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पाण्यासाठी स्थानिकांध्ये वाद, तंटे, भांडणे झाल्याचे पाहायला मिळते. पाण्यासाठी तीन, तीन किलोमीटर महिला, पुरूषांना पायपीट करावी लागते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी योजनेच्या विहिरीताल पाणी आटले. त्यामुळे नळाचे पाणी बंद झाले. सध्या शिवसेनेचे कुलदिपतात्या कोंडे गावात पाण्याचा टँकर पाठवतात. तर गावचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी एका उद्योजकाच्या मदतीने टँकर सुरू केला आहे. ग्रामस्थ त्यातील पाणी वाटून घेतात. 
 
सरंपच गायकवाड यांनी सांगितले, जलजीवन योजनेंतर्गत दोन कोटी रूपये मंजूर झाले. परंतु गावामध्ये नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे जवळच्या दिवडी गावातील तलावातून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्यामुळे पुढील काम रखडले आहे. त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने पाठवलेला टँकरचे प्रस्ताव  प्रांताधिकारी कार्यालयात गेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर पंचायत समिती टँकरचा आदेश काढते. साळवडे गावचा प्रस्ताव मंजूर झाला असून दोन दिवसात टँकरचे आदेश दिले जातील, असे पंचायत समितीने सांगितले. तर वारवंडचा प्रस्ताव पाहणी करून तहसील कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे.

Related Articles