पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज   

क्रीडामंत्री भरणे यांचे मत 

पुणे : पर्यावरणाची हानी करून मानवी विकास करणे हिताचे ठरणार नाही.  विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे क्रीडा, युवक अल्पसंख्यांक विकासमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 
  
रोटरी इंटरनॅशनलने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रकल्प राबवण्यास कायमच प्रथम प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम आणि सिनर्जी क्लब्ज ऑफ रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी दोन दिवसीय ग्रीन एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक अल्पसंख्यांक विकासमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किशोर पंप्सचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक किशोर देसाई, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शीतल शहा, रोटरी पर्यावरण समितीचे संचालक वसंतराव माळुंजकर, ग्रीन एक्स्पोचे प्रकल्प संचालक केशव ताम्हनकर, रोटरी क्लब ऑफ पुणे विझडमचे अध्यक्ष नीलेश धोपाडे आदी उपस्थित होते. आज रविवारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ग्रीन एक्स्पो नागरिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. हा ग्रीन एक्स्पो यशस्वी करण्यासाठी पुणे मेट्रो, टाटा ग्रीन बॅटरिज, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ, श्रॉफ फाउंडेशन आणि सनगेट सोलार यांचे सहकार्य लाभले आहे.  
  
यावेळी बोलताना भरणे म्हणाले, पर्यावरण जागृतीसाठी विविध संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन ग्रीन एक्स्पोसारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या वैयक्तीक जीवनात पर्यावरणाला प्राधान्य दिले, तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील. किशोर पंप्सचे कार्यकारी संचालक किशोर देसाई म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून वैयक्तिक स्तरापासून ती जबाबदारी सुरू होत असते. नैसर्गिक स्रोत मुबलक उपलब्ध असताना केवळ मनुष्याच्या हव्यासपूर्ण स्वभावामुळे निसर्गाचे नुकसान होत आहे. सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ पुणे विझडमच्या स्वाती यादव यांनी केले. प्रशांत आकलेकर यांनी आभार मानले. 

Related Articles