भारतीय ज्ञान व नीतिमूल्ये शाश्वत नेतृत्वासाठी महत्त्वाची : डॉ. जोशी   

टिळक विद्यापीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या युगात शाश्वत नेतृत्वासाठी भारतीय तत्वज्ञान, सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असलेली भारतीय ज्ञान प्रणाली व नैतिकतेची चौकट ही पायाभूत तत्त्वे महत्वाची ठरतील, असे प्रतिपादन लिबरल आर्ट्स विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रीती जोशी यांनी केले.
  
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने एआय, ’लीडरशिप अँड एथिक्स ट्रान्सफॉर्मिंग बिझनेस स्ट्रॅटेजीज फॉर ए सस्टेनेबल फ्युचर’ या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रीती जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्घाटन समारंभास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता व प्रमुख डॉ. प्रणती टिळक आणि व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनीषा शेडगे आदी उपस्थित होत्या.विद्यापीठाच्या मुकुंदनगर येथील कॅम्पसच्या सभागृहात ही परिषद पार पडली. 
 
डॉ. जोशी म्हणाल्या, सध्या जग हे जलद तांत्रिक बदलांनी प्रेरित असून आज आपल्याला मानव-केंद्रित, मूल्याधारित अशा नवोपक्रमाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणाली ही पर्यावरण, समाज कल्याण आणि नैतिक जबाबदारीशी सुसंगत व काळानुरूप प्रत्येक पातळीवर पडताळलेले ज्ञान प्रदान करण्यावर भर देईल. अशा वेळी नैतिकतेची जोड मिळाल्यास एआय हे जागरूक, समावेशक आणि शाश्वत पर्यायांची उपलब्धी म्हणून काम करेल. यामुळे भविष्यात एआयचा वापर करणारे नेतृत्व देखील अधिक सहानुभूतीपूर्ण, शाश्वत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असण्याची शक्यता वाढेल.
  
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि नीतिमत्ता हे नजीकच्या भविष्यासाठी ब्लूप्रिंट आहेत. एआय हे एखाद्या साधनाप्रमाणे तर नैतिकता हे दिशादर्शक म्हणून काम करीत भविष्यातील नेतृत्त्वाला पूरक ठरतील. याच जोरावर हे नेतृत्व आपले वेगळेपण सिद्ध करेल, असेही डॉ. जोशी यांनी नमूद केले. नेतृत्व म्हणजे केवळ धाडसी पावले उचलणे नाही, तर नेतृत्व करताना योग्य पावले उचलणे हे देखील महत्त्वाचे असते. अशा वेळी एआयला प्रशिक्षित करीत नैतिकता जपणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असेल त्यांनी सांगितले.

Related Articles