विविध क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर   

आशिष शेलार यांचे प्रतिपादन 

पुणे : आधुनिक काळात अनेक क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर आहे. मात्र, नवकल्पनांसाठी सातत्याने व्यासपीठे उपलब्ध झाली पाहिजेत. या व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळापासूनच्या नवकल्पना पुढे येऊ शकतील. असे मत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शेलार बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, अधिष्ठाता प्रो. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजिका अमृता देवगांवकर आणि आयोजक मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी उपस्थित होते. 
 
शेलार म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने समान संधी आणि समान संरक्षणाची हमी प्रदान केली आहे. त्याला अनुसरून शहरी तसेच ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ देणारा पुणे स्टार्टअप एक्स्पो हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समान संधी आणि संरक्षण, प्रत्येकाला द्यायचे असेल, तर नवकल्पनांचेही विकेंद्रीकरण झाले पाहिजे. चंद्रकांत पाटील म्हणाले, सामान्य नागरिक नोकरीपलीकडे फारसा विचार करताना दिसत नाही. जागतिक पातळीवर विचार केला तर मागील काही वर्षात भारतातील महिला स्टार्ट अप्स हे जगात पहिल्या क्रमांकावर असून पुरुषांनी बनविलेले स्टार्ट अप्स हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकीय मानसिकता घडवण्याचे कार्य होत आहे.डॉ. राहुल कराड, अमृता देवगांवकर, मंदार देवगावकर, अमित आंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles