पती पसंत नाही म्हणून संसार करण्यास नकार   

विवाह रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश 

पुणे : माझ्या मनाविरोधात लग्न झालेले आहे. मला पती पसंत नाही, असे म्हणत संसार करण्यास पत्नीने नकार दिल्याने न्यायालयाने हे लग्नच रद्दबातल ठरवले आहे. लग्नानंतर आठ महिन्यांनी माहेरी गेल्यानंतर पत्नी पुन्हा सासरी आलीच नाही. त्यामुळे विवाह रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. फुलबांधे यांनी दिला. 
  
सागर आणि रेशमा (नावे बदललेली आहेत) यांचे १७ डिसेंबर २०२२ ला पारंपरिक पध्दतीने पाहणी करून लग्न झाले होते. लग्नाच्या दिवशी रेशमा नाराज होती. याबाबत सागरने विचारल्यानंतर रेशमाने आपण आजारी असल्याचे सांगितले. काही दिवसात सर्व सुरळीत होईल, अशी सागरला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. पूजा झाल्यानंतर सागर यांनी पत्नीला घर आवडले का, असे त्याने विचारले. त्यावेळी ती म्हणाली, मला पतीच आवडला नाही. घरच्यांच सांगण्यावरून जबरदस्तीने लग्न करावे लागले. लग्नानंतर तिने वैवाहिक संबंधात नकार दिला. ती सतत माहेरी जायची. २० ऑगस्ट २०२३ ला रेशमा या माहेरी गेल्या. 
 
सागर आणि कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न करूनही ती परत आलीच नाही. त्यामुळे सागर यांनी वकील राहुल जाधव यांच्यामार्फत लग्न रद्द करण्याचा दावा दाखल केला होता. नोटीस पाठवूनही पत्नी हजर न झाल्याने न्यायालयाने एकतर्फी हा आदेश देत लग्न रद्द केले. विवाह झाल्यापासून एक वर्षाच्या आत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रकरणात १७ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाले होते. वर्षाच्या आत १४ डिसेंबर २०२३ रोजी दावा दाखल केला होता. 
 
घटस्फोट घेतल्यानंतर पती किवा पत्नीवर घटस्फोटीत असा शिक्का पडतो. मात्र, चुक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. लग्न रद्द करण्याच्या निर्णयामुळे दोघेही स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहेत. 
-राहुल जाधव, सागरचे वकील 

Related Articles