मुलीवर अत्याचार करणार्‍या सावत्र वडिलास जन्मठेप   

पुणे : पत्नीच्या मृत्यूनंतर पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणार्‍या आरोपी वडिलास न्यायालयाने जन्मठेप व ७० हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला. 
  
पीडित मुलगी आईच्या मृत्यूनंतर आरोपी वडिलाकडे राहयला होती. त्यावेळी वडिलांनी संधी साधत वेळोवेळी मुलीवर अत्याचार केला. याबाबतची वाच्यता कुठेही केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी वडिलाने पीडितेला दिली. त्यामुळे पीडितेने घडलेला प्रसंग कुणालाही सांगितला नाही. मात्र, वेदना असहय्य झाल्याने ती घरातून पळून गेली. नंतर एका कॅफेमध्ये जाऊन तिने मदत मागितली. कॅफेतील लोकांनी तिला मदत केली. त्यानंतर पीडितेने वडिलाच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. नंतर वाकड पोलिसांनी या गुन्ह्याचा अधिक तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 
   
या खटल्यात विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने बचावासाठी पाच साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. जी. गोडे यांनी केला. या खटल्यात पोलीस कर्मचारी डी. एस. पांडुळे व निलेश दरेकर यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. तसेच, दंडाची ७० हजार रूपयांची रक्कम मुलीला देण्यात यावी. यासह मुलीला मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई देण्यासंबंधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला आदेशात सूचित केले आहे. घटनेच्या वेळी मुलीचे वय अवघ्ये १५ वर्षे होते. सावत्र वडिलांबरोबर राहत असताना त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता.

Related Articles