आयसीसी दोन चेंडूचा नियम बदलणार?   

मुंबई : एकदिवसाच्या क्रिकेटचे सामने हे फलंदाजीसाठी उपयुक्त असतात. तसेच फलंदाजांचा ५० षटकांच्या सामन्यात मोठा दबदबा देखील असतो. मात्र आयसीसीने या ५० षटकांच्या एकदिवसाच्या सामन्यांतील दोन चेंडूचा नियमाबाबत विचार करण्यास सुरुवात केली आहे. आयसीसी हा नियम रद्द करू शकते किंवा या नियमात मोठा बदल देखील होवू शकतो.  आयसीसीच्या पथकाच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली असताना त्यांनी या नियमात बदल करण्यात यावा यासाठी आवाज उठविला होता. तसेच एका चेंडूचा वापर करण्यात यावा यासाठी देखील प्रयत्न केले होते. 
  
मात्र मागील काही दशकांपासून हा आयसीसीचा दोन चेंडूंचा नियम आजही कायम आहे. मात्र आता या नियमामध्ये महत्त्वपुर्ण बदल अपेक्षित आहेत असे आयसीसीचे म्हणणे आहे. याबाबत हरारे येथे बैठक घेण्यात येणार आहे. कुकाबुरा कंपनीच्या पांढर्‍या रंगाच्या चेंडूचा सध्या एकदिवसाच्या सामन्यासाठी वापर होतो. सामन्याच्या शेवटी गोलंदाज हे नव्या चेंडूंचा वापर करतात मात्र यावेळी हे चेंडू नवीन असल्यामुळे कडक असतात. त्यामुळे याचा फायदा फलंदाजांना होतो. 
 
फलंदाज अगदी सहज मोठी धावसंख्या उभा करू शकतात. ३० यार्डच्या बाहेरील क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडविताना अडचणी येतात आणि याचा फायदा फलंदाजांना होतो. याआधी माजी फलंदाज सचिन तेंडूलकर यांनी दोन चेंडू वापरल्यानंतर काय परिणाम धावफलकावर होतो याबाबत भाष्य केले होते. दोन चेंडूचा वापर हा रिव्हर्स स्विंग बाहेरील बाजूस करण्यासाठी होतो. त्यामुळे कमीत कमी ३५ षटके टाकल्यानंतर चेंडू हा रिव्हर्स स्विंग करण्यासाठी चांगला तयार होतो. त्यामुळे रिव्हर्स स्विंगवर गोलंदाजांना बळी मिळविता येतात. मात्र जेव्हा दोन चेंडूचा वापर एका सामन्यात केला जातो त्यावेळी पहिला चेंडू हा पहिली २५ षटके वापरला जातो. मात्र यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करण्याच्या संधीचा लाभ घेता येत नाही. तसेच फिरकीपटूंना देखील फिरकी गोलंदाजी करताना नव्या चेंडूमुळे अवघड जाते. 
 
आयसीसीचे तीन नवे नियम 
 
१) एका सामन्यात एकाच पांढर्‍या रंगाच्या चेंडूचा वापर करावा.  
२) कसोटी, आणि १९ वर्षाखालील क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक (५० षटकांचा) आणि टी-२० चे सामने यांमध्ये षटके टाकण्याची वेळ मोजण्यासाठी क्लॉक टायमरचा वापर करण्यात यावा. 
३) २५ षटके होईपर्यंत २ चेंडू वापरण्यात येतील. त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ यापैकी कोणताही १ चेंडू सामना संपेपर्यंत कायम ठेवेल. 

Related Articles