कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!   

चर्चेतील चेहरे, राहुल गोखले 

गेल्या वर्षीच्या  सप्टेंबर मध्ये  सीताराम येचुरी यांचे  निधन झाले.त्या नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीसपद रिकामे होते. माजी  सरचिटणीस प्रकाश करात यांच्याकडे पक्षाची राजकीय व्यवहार समिती (पॉलिटब्युरो) आणि केंद्रीय समितीचे समन्वयपद सोपविण्यात आले असले तरी ती तात्पुरती व्यवस्था होती. आता मात्र त्या पक्षाला नवीन सरचिटणीस लाभला आहे. पक्षाच्या मदुराई येथे नुकत्याच  झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात एम ए बेबी यांची सीपीएमच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. बेबी यांच्याकडे सरचिटणीसपद अशा वळणावर आले आहे जेंव्हा त्या पक्षासमोर केरळ वगळता देशभरात अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तेंव्हा त्यांना लगेचच पक्ष संघटन मजबूत करण्यास स्वतःस झोकून द्यावे लागेल यात शंका नाही.
 
सीपीएम पक्षावर मुख्यतः दोन राज्यांचे वर्चस्व राहिले आहे- पश्चिम बंगाल आणि केरळ. त्रिपुरात सीपीएम पक्षाची दीर्घकाळ सत्ता होती हे खरे; मात्र ते राज्य तुलनेने छोटे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि केरळ या मोठ्या राज्यांचा पक्ष संघटनेत वरचष्मा असणार यात नवल नाही. आता तर पश्चिम बंगालमध्ये देखील सीपीएमची सत्ता नाही ,उलट  तेथे त्या पक्षाची स्थिती अतिशय कमकुवत आहे. तेंव्हा राहिले केरळ. बेबी यांच्या निवडीत बहुधा तोच घटक महत्त्वाचा ठरलेला असावा. अर्थात त्याचा अर्थ बेबी यांचा अनुभव केरळपुरताच मर्यादित आहे असे नाही. डाव्या चळवळीची धुळाक्षरे जरी त्यांनी केरळात गिरविली असली तरी राष्ट्रीय राजकारणाचा देखील अनुभव त्यांच्यापाशी आहे. 
 
१९५४ मध्ये केरळमधील कोल्लम येथे पी एम अलेक्झांडर आणि लिली अलेक्झांडर यांच्या पोटी मरियम यांचा जन्म झाला. प्रकुल्लम येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि कोल्लम येथील एस एन महाविद्यालयात त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. राज्यशास्त्र विषयातून पदवीधर होण्यासाठी त्यांनी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तरी त्यांची रुची  राज्यशात्राच्या अभ्यासक्रमापेक्षा प्रत्यक्ष राजकारणातच जास्त होती. त्यांची राजकीय जडणघडणच मुळी डाव्या विचारधारेत झाली. साहजिकच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या डाव्या विचारधारेच्या विद्यार्थी आघाडीतून त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा आरंभ केला. या संघटनेचे अगोदरचा अवतार म्हणजे केरळ स्टुडंट्स फेडरेशन. १९७० चे दशक हे देशभर अस्वस्थतेचे दशक होते. केरळ त्यास अपवाद नव्हते. आणीबाणीच्या काळात बेबी यांनी आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना तुरुंगवास देखील घडला. किंबहुना तरुणांना चळवळीत येण्यास प्रवृत्त करण्याच्या त्यांच्या नेतृत्वगुणांना तेथे वाव मिळाला आणि बेबी यांनीही आपले नेतृत्वगुण सिद्ध केले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत देखील बेबी सक्रिय होते.
 
या सर्व काळात त्यांची ओळख ‘डाव्यांचा उगवता तारा’ अशी होत होती. याचे कारण त्यांची आक्रमक भाषणे हे आणि विचारधारा आणि व्यवहार यांच्यात सांगड घालण्यात त्यांची कल्पकता आणि चाणाक्षपणा हे होते. परिणामतः एसएफआयमध्ये बेबी यांचा आलेख चढा राहिला. विद्यार्थी चळवळीत त्यांनी दिलेले प्रभावी नेतृत्व आणि केलेली संघटनात्मक बांधणी यामुळे त्यांच्याकडे सीपीएमच्या े नेतृत्वाचे लक्ष गेले नसते तरच नवल. त्यामुळे बेबी यांची वाटचाल संसदीय राजकारणाकडे झाली आणि लवकरच ते तेथे सक्रिय झाले. 
 
याच सुमारास बेबी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर डाव्यांच्या अधिवेशनांना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या एकूण डाव्या चळवळीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या कक्षा रुंदावल्या. कलेचा उपयोग वैचारिक माध्यम म्हणून करण्याची त्यांची दृष्टी त्याच दरम्यान विकसित झाली. चित्रपट, नाटक, संगीत या माध्यमांतून आपला विचार मोठ्या जनसमुदायापर्यंत प्रभावीपणे पोचू शकतो; त्यातून समाजपरिवर्तन घडविता येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली. त्यांच्या त्या दृष्टिकोनामुळे अनेक कलाकारांच्या संपर्कात ते आले आणि कमल हसन, अदूर गोपालकृष्णन, एल सुब्रमणियम प्रभृतींशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध तयार झाले. याचाच परिणाम असेल; पण बेबी हे कर्मठ डावे बनले नाहीत. असे म्हटले जाते की राजकीय लवचिकपणा दाखविण्यात त्यांना संकोच वाटत नाही. अर्थात आपल्या विचारधारेशी तडजोड करणारा हा लवचिकपणा नव्हे; तर राजकीय व्यवहारिकतेचा विचार करून दाखविलेला लवचिकपणा हा त्याचा अर्थ.
 
प्रकाश करात किंवा तत्सम नेत्यांनी जी राजकीय ताठरता दाखविली तो बेबी यांचा पिंड नव्हे असे म्हटले जाते. कदाचित या बाबतीत त्यांची जातकुळी येचुरी यांच्याशी जुळणारी असावी. त्यामुळेच येचुरी यांचे ते उत्तराधिकारी ठरत आहेत हा योगायोग असला तरी तो सूचक मानावा असा आहे. या लवचिकपणाचे आणखी एक कारण म्हणजे राष्ट्रीय राजकारणाचा त्यांना असणारा अनुभाव हेही असू शकते. १९८६ मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठविले. तेंव्हा त्यांचे वय अवघे ३२ वर्षांचे होते. १९९८ पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. शिवाय इ एम एस नंबुद्रिपाद सीपीएमचे सरचिटणीस असताना पक्षाचा दिल्लीतील कारभार बेबी हेच पाहत असत. तेंव्हा त्यांच्या राजकीय अनुभवाचा आवाका तरुण वयातच रुंदावला होता. 
 
१९८५ मध्ये पक्षाच्या केरळ शाखेच्या समितीत त्यांचा समावेश करण्यात आला; तर १९८९ मध्ये ते पक्षाच्या केंद्रीय समितीत नियुक्त झाले. २००६ मध्ये  बेबी  कुंदरा विधानसभा मतदारसंघातून केरळ विधानसभेवर निवडून गेले आणि त्याच विजयाची पुनरावृत्ती त्यांनी २०११ मध्येही  केली. व्ही एस अच्युतानंदन यांच्या मंत्रिमंडळात बेबी शिक्षण खात्याचे मंत्री झाले. बेबी यांची बौद्धिक प्रगल्भता हा बहुधा त्यामागील निकष असावा. बेबी यांनी धडाकेबाज धोरणात्मक निर्णय घेतले आणि राबविले. उच्च माध्यमिक  प्रवेशासाठी  त्यांनी एक खिडकी योजना आणली. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी नेटाने प्रयत्न केले. विशेषतः वंचित समाजांपर्यंत शिक्षण पोचावे म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांच्या या उपाययोजनांचे स्वागत झाले; पण त्याबरोबरच क्रमिक पुस्तकांतून नास्तिकतेचा प्रसार केला जात असल्याचा आरोपही झाला आणि बेबी वादग्रस्त ठरले. २०११ पर्यंत ते शिक्षण मंत्री होते.
 
त्यांचा हा आलेख चढताच राहिला असता; पण त्यात काहीसा खंड आला कारण मुख्यमंत्री बदलाबरोबरच नवीन नेत्यांचा उदय झाला. त्यांत विद्यमान मुख्यमंत्री विजयन यांचाही समावेश होता. मात्र विजयन यांच्याशी बेबी यांनी जुळवून घेतले आहे. किंबहुना आताही वयाची ७५ वर्षे ओलांडलेल्यांना पॉलिटब्यूरो मधून निवृत्त करण्याच्या नियमाला अपवाद करीत विजयन (वय वर्षे ८०) यांना कायम ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर केरळमध्ये डावी आघाडी पुढील निवडणूक विजयन यांच्याच नेतृत्वाखाली लढवेल असेही सूतोवाच बेबी यांनी केले आहे. पक्षाला सत्तेपर्यंत पोचविण्यात विजयन यांची भूमिका महत्वाची असेल हा हिशेब त्यामागे असू शकतो; तद्वत आपण सरचिटणीस असलो तरी लोकसभेची निवडणूक हरलो आहोत याचे भानही त्यामागील कारण असू शकते.  २०१४ मध्ये कोल्लम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली खरी; तथापि क्रांतिकारी समाजवादी पक्षाच्या (आरएसपी) उमेदवाराने त्यांचा ३८ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता.
 
२०१२ पासून सीपीएम पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य असलेले बेबी हे त्या पक्षाचे सहावे सरचिटणीस ठरले आहेत. नंबुद्रिपाद हे पहिले मल्याळी सरचिटणीस. करात हे केरळमधीलच असले तरी त्यांचे ’केडर’ दिल्ली. त्या अर्थाने बेबी हे दुसरेच मल्याळी सरचिटणीस ठरतात. मात्र बेबी यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदविला गेला आहे आणि तो म्हणजे अल्पसंख्यांक समाजातून आलेले ते पहिलेच सरचिटणीस आहेत. सीपीएम पक्षासमोर अनेक आव्हाने असताना  त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे . एक तर त्यांना पक्षीय ऐक्य साधावे लागेल. याचे कारण त्यांची निवड एकमताने झालेली नाही. विशेषतः पश्चिम बंगालमधील सदस्यांची मागणी महाराष्ट्रातील नेते अशोक ढवळे यांच्या गळ्यात ही माळ पडावी अशी होती. ती फलद्रुप झाली नाही. तेंव्हा पॉलिटब्यूरो स्तरावर बेबी यांना मतभेदाच्या या भेगा बुजवाव्या लागतील. मात्र त्याहून मोठे आव्हान म्हणजे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचे. पश्चिम बंगालच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. गेल्या निवडणुकीत (२०२१) त्या पक्षाला तेथे खातेही उघडता आले नव्हते. बेबी यांची पहिली कसोटी तेथेच असेल. मरियम अलेक्झांडर बेबी हे त्या कसोटीत कशी कामगिरी करतात यावर त्यांचेच नव्हे तर सीपीएम पक्षाचे भवितव्यही अवलंबून असेल!

Related Articles