पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण   

जलसंपदा मंत्र्यांचे आदेश
 
मुंबई, (प्रतिनिधी) : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापराचे सूत्र ठरले असून, त्यानुसार पाणी वापराचे लेखापरीक्षण करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि स्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी सूचना जल्पसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
 
जलसंपदा विभागाच्या वतीने  १५ ते ३० एप्रिल २०२५ या  कालावधीत ’जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात  विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी विखे यांनी, जलसंपदा  विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी आणि अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना केल्या. 
 
या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे,  या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे विखे म्हणाले.कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे जनसामान्यात राज्य सरकारची  प्रतिमा उंचावेल. 

Related Articles