एस.टी. कर्मचार्‍यांचा पगार सात तारखेलाच होणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडे ९०० कोटींची मागणी केलेली असताना एस.टी. महामंडळाला केवळ २७२ कोटी मिळाले. त्यामुळे कर्मचार्‍यांना पूर्ण पगार देता आला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घातल्यानंतर मंगळवारपर्यंत पगार होईल, असे अर्थ सचिवांनी सांगितले आहे. यापुढे प्रत्येक महिन्यात सात तारखेपूर्वी पगार व्हावा, यासाठी राजशिष्टाचार बाजूला अर्थसचिवांना भेटणार असल्याचे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. अर्थखात्यातील अधिकारी अजित पवार यांच्याकडे फाईल जाऊच देत नाहीत. आम्ही आमचे हक्काचे पैसे मागतोय, भिक मागत नाही, असा संतापही सरनाईक यांनी व्यक्त केला.निधी नसल्याने एस.टी. कर्मचार्‍यांना पगाराच्या केवळ ५६ टक्केच रक्कम दिली जात असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी काल राजशिष्टाचार बाजूला ठेऊन अर्थ विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. 
 
अर्थखात्यात झारीतील शुक्राचार्य 
 
एस.टी. कर्मचार्‍यांच्या पगाराची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही, ती परस्पर अधिकार्‍यांकडून परत पाठवली जाते, असा आरोप सरनाईक यांनी केला. आम्ही अर्थ खात्याकडे भीक मागत नाही, तर आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात हा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे. अन्य सरकारी कर्मचार्‍यांना पगार मिळतो, तसा तो एस.टी. कर्मचार्‍यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका सरनाईक यांनी घेतली.

Related Articles