‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट   

कडक कारवाई करण्याची वळसे पाटील यांची सूचना
 
भीमाशंकर (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यात बहुतेक ठिकाणी रात्रीचा अवैध्य वाळूचा उपसा सुरू असून यावर कडक कारवाई करावी. तसेच आपले सरकार सेवा केंद्राबाबत नागरिकांच्या खूप तक्रारी असून केंद्र चालक जास्त पैसे घेत आहेत. यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.  
  
आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांचा आढावा व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे जनता दरबार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित घेण्यात आला. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, विद्युत कार्यकारी अभियंता शांताराम बांगर, उपकार्यकारी अभियंता राजू भोपळे, स्वप्निल काटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संजय गवारी, प्रकाश घोलप, अक्षय काळे उपस्थित होते. 
 
जनता दरबारामध्ये प्रामुख्याने महसुल, पंचायत समिती, बांधकाम विभाग, विदयुत विभाग, भूमिअभिलेख याबाबत नागरिकांनी आपली समस्या उपस्थित केल्या. तसेच अनेक ठिकाणी छोट्या - मोठ्या रस्त्यांवरील वाद, पानंद रस्त्यांची मागणी याचाही आढावा वळसे पाटील यांनी यावेळी घेतला. तसेच जलजीवन मिशन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची होत असलेल्या कामांबाबतच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या. याबाबतच्या सूचना जलजीवन मिशनच्या अधिकार्‍यांना वळसे पाटील यांनी दिल्या. यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. 

Related Articles