वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान   

बेल्हे, (वार्ताहर) : आगीच्या वणव्यात आंब्याची बाग जळून खाक झाल्याची घटना आणे (ता.जुन्नर) पठारावर आनंदवाडी शिवारात घडली. अनोळखी व्यक्तीने लावलेल्या आगीत दिलीप ठमाजी गांडाळ या शेतकर्‍याच्या शेतातील कलमी आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
आनंदवाडी येथे दिलीप गांडाळ या शेतकर्‍याच्या शेतातील कलमी आंब्यांच्या ५२ झाडांना मोठ्या प्रमाणात आंबे लागले होते. परंतु आगीच्या वणव्यात झाडावरील सर्व आंबे होरपळून गेल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच बागेत लावलेली २८ चंदनाची तसेच काही चिंचेची झाडे पूर्णपणे जळून नष्ट झाली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या पाईप लाईनचे पाईप जळून खाक झाले आहेत. मात्र, सुदैवाने जवळच असलेल्या जनावरांच्या चार्‍याची गंजी आगीपासून वाचवण्यात त्यांना यश आले आहे.
 
शेतात काम करणार्‍या सुमिता गांडाळ, समिंद्रा गांडाळ, हेमलता गांडाळ, बारकूबाई गांडाळ, गीतांजली गांडाळ, ललिता गांडाळ, पायल गांडाळ,अनिता गांडाळ, सानिया इनामदार, वंदना ढगे महिलांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझविल्याने कडब्याची गंजी वाचली.या आगीत शेकडो हेक्टर चराऊ रान जळून खाक झाल्यामुळे परिसरात मोर, हरिण, ससे या जंगली प्राण्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आणे येथीलच दुसर्‍या घटनेत जांभळदरा, संमेराववस्तीत आग लागून मोठ्या प्रमाणात चराऊ रान जळून गेले आहे या आगीत महादू अहीलाजी दाते या शेतकर्‍यांचे आठ पीव्हीसी पाईप, शेती उपयुक्त साहित्य जळून गेले.

Related Articles