पीएमपीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेर्‍यांचा होणार वापर   

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) प्रवाशांच्य सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. पीएमपी बसमध्ये लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित असलेल्या कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पीएमपी एआयचा वापर करणारी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल.
 
पीएमपी प्रशासनाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव सादर करण्यासाठी एप्रिलच्या अखेरीस पीएमपी अधिकार्‍यांना नवी दिल्लीला बोलावण्यात आले. एआय कॅमेरे बसवण्याबाबत तेथे सादरीकरण केले जाईल. मंजुरी मिळताच सर्व बसेसमध्ये एआय कॅमेरे बसवले जातील. या योजनेची किमत सुमारे पाच कोटी आहे.
 
पीएमपी बसमध्ये लवकरच एआय तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यातील एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येणार आहे. त्या माध्यमातून चालकावरही लक्ष ठेवता येईल. पीएमपी बसचे काही अपघात चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. तसेच, काही चालक वाहतूक नियमांचे पालन देखील करताना दिसत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींवर एआय कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत.  गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये बसवण्यात येणारे एआय कॅमेरे प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देतील.

Related Articles