डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल   

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पर्यायी वळविण्यात येणार आहे.
 
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणार्‍या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणार्‍या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणार्‍या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
 
पुणे रेलवे स्थानकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात मोठ्या संख्येने जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेने कऴविले आहे.

Related Articles