नद्यांच्या प्रदूषणास महापालिका जबाबदार मनसेचा आरोप   

प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठविण्यात आला. मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन त्यांना या प्रदूषणास महापालिका जबाबदार असल्याचे सांगत, महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. याची दखल घेतली नाही, तर मंडळाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
 
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस आणि केदार कोडोलीकर, संजय दिवेकर, प्रशांत भोलागीर, महेश शिर्के, अनिल कंधारे, राहुल घोडेकर, अनिल पवार, निखिल जोशी, राहुल वानखेडे, राजू राठोड यांच्या शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांची भेट घेतली. त्यांना याबाबतचे निवेदन दिले. साळुंखे यांनी त्यांना मंडळाने महापालिकेला वारंवार बजावलेल्या नोटिसांची फाइलच दिली. 
 
संभूस म्हणाले, महापालिका हद्दीत काही दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज तयार होते. त्यातील बरेचसे सांडपाणी थेट मुळा-मुठेत सोडले जाते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले आहेत. मात्र, ते अपुर्‍या क्षमतेने चालतात. त्यामुळे तब्बल ४०६ दशलक्ष लिटर पाणी दररोज विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे या पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपला आहे. त्यातील जैवविविधता संपुष्टात आली आहे. अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते. कोणत्याही पुणेकराला आपल्या मुळा-मुठेला मृत म्हटले तर आवडणार नाही, पण ते सत्य आहे.

Related Articles