मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्‍हे   

पुणे : बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे खुर्द गावात तरुणाच्या त्रासास कंटाळून अल्पवयीन शाळकरी मुलीने आत्महत्या केली.  विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.  त्यांनी सांगितले की, आजही आपल्या समाजात अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता ११२ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. तसेच महिला सहायता संस्था जसे की स्त्री आधार केंद्र यांच्याकडे संपर्क साधून मदत घेता येईल. मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता पालकांनी त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
 
डॉ. गोर्‍हे यांनी शैक्षणिक संस्थांनाही या विषयात पुढाकार घेण्याचे सुचवले. शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि मदत केंद्रांची माहिती देणारे कार्यक्रम नियमितपणे राबवले जावेत. समाजानेही अशा घटना रोखण्यासाठी एकत्र येऊन सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles