चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण   

रिंकी रॉय यांनी दिला आठवणींना उजाळा; ‘अपनी कहानी छोड जा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पुस्तक व चित्रपटांच्या रूपाने प्रेक्षकांनी माझ्या वडिलांना स्मरणात ठेवले आहे. कुठलेही काम मनापासून करण्याचे व्यसन त्यांना होते, असे बिमल रॉय यांच्या आठवणी जागवताना त्यांच्या कन्या रिंकी रॉय-भट्टाचार्य यांनी सांगितले.वंदना कुलकर्णी लिखित ‘अपनी कहानी छोड जा’ या बिमल रॉय यांच्या सिनेमावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राजलक्ष्मी कलादर्शन सभागृहात झाले. प्रतीक प्रकाशन आणि बियाँड एन्टरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी रिंकी रॉय-भट्टाचार्य बोलत होत्या. यावेळी प्रतीक प्रकाशनचे प्रवीण जोशी, चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर, अर्चना गोडबोले, सतीश पाकणीकर, धनंजय कुरणे, विवेक पाध्ये उपस्थित होते. 
 
रॉय-भट्टाचार्य म्हणाल्या की, ‘उदय पोथे’ या बंगाली चित्रपटातून बिमलदांनी ब्रिटिशांना चपराक लगावली. या चित्रपटातील संवाद लोकांना तोंडपाठ होते. कलाकारांचा नाटकी अभिनय बदलून चित्रभाषा देणारा हा चित्रपट असल्याचे सत्यजित रे यांनी त्यावेळी म्हटले होते. या चित्रपटाची संगीत संकल्पना राष्ट्रगीत होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ‘जन गण मन’ वापरण्याचे धाडस बिमलदांनी केले होते.पुस्तक प्रकाशनानंतर बिमल रॉय यांच्या चित्रपटातील काही दृश्ये आणि गीते दाखविण्यात आली. यावेळी लेखिका कुलकर्णी यांनी रॉय-भट्टाचार्य आणि मधुमती चित्रपटाचे छायाचित्रकार दिलीप गुप्ता यांच्या कन्या मानुषी गुप्ता यांच्याशी संवाद साधला. अनघा कोर्‍हाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles