साखरपुड्यानंतर लग्न मोडले; तरूणावर गुन्हा   

पुणे : लग्नासाठी दोन्ही कुटुंबामध्ये बैठक झाली आणि सुपारी फोडून साखरपुडाही केला. त्यादरम्यान, या दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. याच काळात, त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि तरूणाने होणार्‍या पत्नीला लग्नास नकार देऊन तिची फसवणूक केली. याप्रकऱणी सिंहगड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
वैभव देवीदास बनसोडे (वय ३२, स्वागत कॉर्नर, भारती विद्यापीठ परिसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकऱणी, २६ वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते २४ फेबुवारी २०२५ दरम्यान घडला. तक्रारदार आणि आरोपी यांच्या दोन्ही कुटुंबात लग्नाच्या बैठका होऊन त्यांच्यात सोयरिक जुळविण्यात आली. सुपारी फोडून लग्न निश्चित केले गेले. त्यानंतर, त्या दोघांचा साखरपुडा २०२३ मध्ये दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, लग्नाची तारीख ठरली नव्हती. दोघेही परस्परांना भेटत होते. या दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्यात मतभेद झाल्याने वैभव बनसोडे याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान, दोन्ही कुटुंबामधील चर्चेत काही तोडगा न निघाल्याने या तरूणाने  तरुणीसोबत लग्नास नकार देऊन तिची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Related Articles