लोकेश राहुलवर कौतुकाचा वर्षाव   

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ च्या हंगामात काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एकट्या केएल राहुलने  नाबाद ९३ धावांची खेळी करत दिल्लीला बंगळुरूविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. दिल्लीने यासह सलग चौथा विजय मिळविला. बंगळुरूला २० षटकांत ७ बाद १६३ धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने १७.५ षटकांमध्येच ४ बाद १६९ धावा केल्या.
 
आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. राहुलने नाबाद ९३ धावा केल्या. मात्र, तो शतक पूर्ण करू शकला नाही. दिल्लीचे गोलंदाज कुलदीप यादव आणि विप्रज निगम यांनीही चांगली कामगिरी केली. आरसीबीकडून टीम डेव्हिड आणि फिलिप सॉल्ट यांनी चांगली खेळी केली. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, दिल्लीने १७.५ षटकांत लक्ष्य गाठले. राहुलची मॅचविनिंग कामगिरी पाहायला मिळाली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावा केल्या. राहुलने ७ चौकार आणि ६ षटकार टोलावले. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ३८ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला.
 
बंगळुरुचा पराभव करत दिल्लीने या हंगामात सलग चौथा विजय मिळवला आहे. बंगळुरुविरुद्ध सामना जिंकताच केएल राहुलने भन्नाट सेलिब्रेशन केलं. दिल्ली आणि बंगळुरुचा सामना बंगळुरुमधील एम.चिन्नास्वामी मैदानावर खेळवण्यात आला होता. केएल राहुलचं हे घरचं मैदान होतं. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर हे माझं घरचं मैदान आहे, असं हाताने खुणावत केएल राहुलने सेलिब्रेशन केलं. केएल राहुलच्या या सेलिब्रेशननंतर बॉलिवूड चित्रपट सिंगममधील मी इकडचा जयकांत शिकरे..अशा डायलॉगने केएल राहुलचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Related Articles