निंबर्गी गावाजवळ टिप्परची एसटीला धडक, सात जखमी   

चालकाच्या हुशारीने अनर्थ टळला,एसटी लगेच रस्त्याच्या खाली घेतली

सोलापूर :- सोलापूरहून तेलगावला निघालेल्या एसटीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिली. यात दोन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण सात जण जखमी झाले. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे जीव वाचले. हा अपघात निंबर्गी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.
  
एसटी चालक विजय नागनाथ लोभे (वय ५१) व टिप्पर चालक परशुराम बगले (वय ५३, दोघेही रा. मंद्रूप), बाबासाहेब आण्णाप्पा कदम (वय ३५, रा. भंडारकवठे), नितीन चिदानंद चौगुले (वय ३१, रा. विंचूर), आनंदराव कलाप्पा सुतार (वय ७३) व सुनंदा सुरेश सुतार (वय ५०, दोघे रा. तेलगाव), सुनंदा मारुती जोडमोटे (वय ३५, रा. मंद्रूप) हे जखमी झाले आहेत.
  
सोलापूर तेलगाव ही एसटी (एमएच १४, बीटी ३३७५) मुक्कामी चालक विजय लोभे व वाहक प्रशांत जेटेथोर घेऊन निघाले होते. एसटीमध्ये ४० प्रवासी होते. निंबर्गी गावापासून एक किलोमीटर अलीकडे एसटी आल्यानंतर समोर समोरून भरधाव वेगात टिपर आला. ते पाहून लोभे यांनी एसटी रस्त्याच्या खाली घेतली. मात्र तोपर्यंत टिप्परने धडक दिली. यामुळे आतील प्रवासी एकमेकांवर आदळले.
 
एसटी चालकाची हुशारी 
 
एसटी चालक विजय लोभे म्हणाले, समोरून भरधाववेगात टिपर येत असल्याचे दिसताच मी एसटी रस्त्याच्या खाली घेतली. तरीही टिपर येऊन धडकला. मात्र मोठी दुर्घटना टळली.

Related Articles