इमारतींचा ताबा घेण्यास अग्निशमन दलाकडून टाळाटाळ   

महापालिकेची अडचण

पुणे : पुणे महापालिकेने कोट्यवधी खर्च करुन शहरात खराडी, कोथरुड, चांदणी चौक आणि धायरी भागात अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांची  कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या भवन विभागाने या इमारती हस्तांतरीत करुन घ्याव्यात, असे पत्र अग्रिशमन दल विभागाला दिले आहे. मात्र अपुर्‍या मनुष्यबळामुळे या इमारतींचा ताबा घेण्यासाठी अग्निशमन दलाकडून टाळाटाळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खराडी, कोथरूडमधील चांदणी चौक आणि धायरी भागात अग्नीशमन दलाची केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांचे काम देखिल पूर्ण करण्यात आले आहे. मात्र इमारतींचे हस्तांतरण करुन घेण्यास अग्नीशमन दल सावध भूमिका घेत आहे. अग्निशमन दलाकडे सध्या अपुरे मनुष्यबळ आहे. अपुर्‍या मनुष्यबळाच्या जोरावर अग्निशमन दलाचा कार्यभार सुरु आहे. त्यात नवीन केंद्र तयार आहेत. मात्र हे केंद्र ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये मनुष्यबळ, कर्मचारी कोठून आणायाचे असा प्रश्न अग्नीशमन दलाला पडला आहे. त्यामुळेच महापालिकेच्या अग्निशमन दलाची केंद्रे जागेवर पडून आहेत.
 
पूर्व हवेलीतील खराडी-चंदननगर, वडगावशेरी, लोहगाव वाघोली या भागासाठी अग्निशामक केंद्रासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या केंद्राच्या इमारतीचे काम २०१८-१९ सुरु झाले. या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे, परंतु अद्यापपर्यंत हे अग्निशामक केंद्र सुरू झालेले नाही. दोन दिवसापूर्वी केंद्राला लागून असलेल्या मोठ्या इमारतीमधील एका खासगी हॉटेलाला आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यासाठी काही वेळ लागला. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. 
 
खराडी भागात खूप सार्‍या आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या असून संपूर्ण खराडी चंदननगर भागात एका आर्थिक वर्षात १२५ ते १५० आगीच्या घटना घडलेल्या आहेत. या अग्निशामक केंद्राचे संपूर्ण काम पूर्ण झालेले आहे सर्व कायदेशीर हस्तातरण प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तरीही फक्त उद्घाटनाअभावी अग्निशामक केंद्र बंद आहे. असा आरोप आम्ही शिरूरकर मिन्न परिवार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष : बाळा उर्फ रमेश पर्‍हाड यांनी केला आहे. हे केंद्र सुरु करण्यासाठी पर्‍हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. 
 
खराडीकरांच्या प्रमुख मागण्या
 
हे अग्निशामक केंद्र तत्काळ सुरु करावे.
या अग्निशामक केंद्राला खराडी अग्निशामक केंद्र अशे नाव देण्यात यावे.
या अग्निशामक केंद्राला कोणत्याही राजकीय व्यक्ती अथवा कुटुंबातील व्यक्तीची नावे देण्यात येऊ नये.  
 
 महापालिकेने खराडी, कोथरुडमधील चांदणी चौक आणि धायरी भागात अग्निशमन केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांच्या इमारतींच्या कामे पूर्ण झाली असून अग्नीशमन दलाला इमारत हस्तांतरण करुन घ्यावी, याबाबतचे पत्र दिले आहे. मात्र विभागाकडून इमारतीचा ताबा घेण्यास उदासीनता दाखवली जात आहे.
 
- युवराज देशमुख, प्रमुख, भवन विभाग, पुणे महापालिका

Related Articles