कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण   

आशिष रामटेके

पुणे : राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या आहाराची प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात असते. कैद्यांना आहार विषयक परंपरेनुसार जेवण दिले जाते. मात्र, त्यांना नियमावली पाळणे आवश्यक आहे. कारागृहात काम केल्यानंतर मिळालेल्या मोबदल्यातून कैदी आवडीचे जेवण करु शकतात, अशी माहिती येरवडा कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली. 
 
येरवडा हे राज्यातील सर्वात मोठे मध्यवर्ती कारागृह आहे. या ठिकाणी साडेतीन हजारांहून अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैद्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. सकाळी साडेसात वाजता नाश्ता दिला जातो. त्यानंतर, सकाळी नऊ वाजता कैदी नेमून दिलेल्या कामावर जातात. सकाळचे जेवण साडेअकरा वाजता दिले जाते. दुपारी बारा ते एक विश्रांतीची वेळ असते. त्यानंतर, एक वाजता कैदी पुन्हा कामावर जातात. सायंकाळी साडेचारपर्यंत काम करून कैदी परत बराकीत येतात. 
 
रात्रीचे जेवण पाच वाजता दिले जाते. सहा वाजता सर्व बराकी बंद केल्या जातात. काही कैदी रात्रीचे जेवण बराकीत नेतात. रात्री सात ते आठच्या दरम्यान ते जेवण करतात. मात्र, तोपर्यंत जेवण थंड झालेले असते. हे जेवण गरम करण्यासाठी विविध शक्कल लढविल्या जात होत्या. त्यातून काही वादावादीचे प्रकारही उद्भवत होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने पुढाकार घेऊन कैद्यांना रात्रीचे जेवण गरम मिळावे म्हणून ’हॉटपॅन’ खरेदी केले आहेत. हे ’हॉटपॅन’ बराकीत ठेवण्यात आले आहे. कैदी जेवण सोबत घेऊन गेल्यानंतर त्या ’हॉटपॅन’मध्ये जेवण ठेऊन रात्री गरम करून खाऊ शकतात. अशी जेवणाबाबतची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 
 
इतर सुविधा
 
येरवडा कारागृहात कैद्यांसाठी जेवण आणि इतर सुविधांबाबत काही नियमावली आहेत. त्यामध्ये कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना मोफत जेवण पुरवले जाते. काही कैद्यांना त्यांच्या कमाईतून खाण्यापिण्याची सोय देखील केली आहे. तसेच, औषधोपचार, कुटुंबीयांसोबत संवाद साधणे आदी. सुविधा देण्यात आल्या आहेत. 
 
उपाहारगृह
 
काही कारागृहांत कैद्यांसाठी स्वतंत्र उपाहारगृहे असतात; जिथे ते आपल्या कमाईतून खाण्या-पिण्याची सोय करू शकतात. 
 
आहारविषयक परंपरा
 
राज्य कारागृह प्रशासनाने कैद्यांना त्यांच्या परंपरा आणि आवडीनुसार जेवण मिळावे, यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कैद्यांना उपाहारगृहात वेगळी भाजी देण्याची सोय केली आहे. 
 
खुल्या कारागृहातील जेवण 
 
चांगली वर्तणूक असलेल्या आणि शिक्षा संपत आलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात हलवले जात असते. अशा कैद्यांना कुटुंबासोबत राहण्याची आणि उदरनिर्वाह करण्याची परवानगी मिळते. खुल्या कारागृहात हलवल्यानंतर अशा कैद्यांना तीन महिने मोफत जेवण दिले जाते. त्यानंतर कैद्यांना स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. 
 
तुरुंग नियम
 
तुरुंगातील नियम आणि कायदे हे देशाच्या कायद्यांशी आणि घटनात्मक आवश्यकतांशी सुसंगत आहेत. याची खात्री करणे राज्यांसाठी आवश्यक आहे.
 
कैद्यांचे हक्क
 
कैद्यांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार असल्यास, कारागृह प्रशासन, सरकारी आणि न्यायिक अधिकार्‍यांशी संवाद साधण्याचा अधिकार आहे.
 
कैद्यांच्या जेवणासंदर्भात कारागृह प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. ही निविदा प्रकाशित झाल्यानंतर सरकार त्याबाबत निर्णय ते घेत असते. यामध्ये न्यायालयाचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. न्यायालय केवळ कैद्यांना शिक्षा, दंड आणि कोठडीचा आदेश देत असते. 
 
विजय ठोंबरे, वकील
 
कैद्यांना दोन वेळा अन्न  
 
कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना दोन वेळा जेवण दिले जाते. सकाळी ७ वाजता नाश्ता दिला जातो. त्यामध्ये पोहे आणि उपमाचा समावेश असतो. त्यानंतर, सकाळी ११ वाजता जेवण दिले जाते. त्यामध्ये चपाती, भाजी, डाळ-वरण आणि भाताचा समावेश असतो. सायंकाळी ५ वाजता रात्रीचे जेवण दिले जाते. दुपारी १२.३० च्या दरम्यान स्नॅक्स किंवा इतर नाश्ता सुध्दा दिला जातो. हे स्नॅक्स कैदी आपल्यासाठी साठवूनही ठेवू शकतो.
 
कारागृह प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कैद्यांना जेवण दिले जात असते. कैद्यांना दररोज दोन वेळा मोफत जेवण आणि एक वेळ नाश्ता दिला जातो. आवडीच्या जेवणासाठी कैद्यांसाठी खास कारागृहात उपाहारगृहाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या उपाहारगृहातून कैद्यांना हवे तशी आवडीची भाजी व जेवण पैसे भरून घेता येते.   
 
- योगेश देसाई, कारागृह, उपनिरीक्षक
 
कैद्यांना कामाच्या बदल्यात मिळणारा मोबदला (प्रतिदिन)
 
वर्गवारी          पूर्वीचे दर             सध्याचे दर        दर वाढ (रूपये) 
 
कुशल          ६७                   ७४                      ७
अर्धकुशल           ६१                   ६७              ६
अकुशल          ४८                   ५३                      ५
 
                                              खुली वसाहत
 
कुशल          ८५                    ९४              ९
 
सरसकट कैद्यांना घरचा डबा नाहीच 
 
कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून सरसकट घरच्या जेवणाची (डबा) सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. परंतु, कैद्यांच्या आरोग्यविषयक बाबींचा विचार करून किंवा विविध आजार असलेल्या कैद्यांना घरचे जेवण मिळावे, याकरिता न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण दिले जाते. मात्र, अशा कैद्यांना किती दिवस घरचे जेवण पुरविले जावे, हे सुद्धा न्यायालय संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार परवानगी देत असते. विशेष म्हणजे, कारागृह अधीक्षकांना देखील कैद्यांच्या आरोग्यविषयक बाबींचा विचार करून घरचे जेवण देण्याचे काही अधिकार बांधील असतात. परंतु, हे अधिकार अधीक्षक नाकारत असल्याचे अनेकदा दिसून आल्याचे एका प्रतिष्ठित वकिलांनी सांगितले. 
 
नियम
 
कैद्यांना घरी बनवलेले जेवण देण्यासाठी काही नियम आहेत, ज्यामध्ये जेवण बनवणार्‍या व्यक्तीची ओळख, जेवणाची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचा समावेश आहे. 
 
उपाहारगृृहाची सोय 
 
प्रशासनाने ठरवून दिलेले जेवण सर्वच कैद्यांना बंधनकारक असते. कैद्यांच्या रोजच्या जेवणात विशेषत: चपाती, भाजी, वरण आणि भाताचा समावेश असतो. महत्वाचे म्हणजे, कैद्यांचा आजार आणि आरोग्यविषयक बाबींचा विचार करूनही जेवण दिले जाते. यामध्ये कमी तिखट भाजीचा देखील समावेश असतो. एखाद्या कैद्यांना वेगळी भाजी, आवडीचे जेवण अथवा मांसाहारी जेवण खायचे असेल, तर त्यांच्यासाठी कारागृहात उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
 
कैद्यांना ऑर्डरनुसार द्यावे लागतात पैसे 
 
मांसाहारी किंवा शाकाहारी जेवणासाठी प्रशासनाची वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. नवरात्र आणि गणपती उत्सवाच्या काळात कैद्यांना उपाहारगृहातून मासांहारी जेवण दिले जात नाही. याकाळात कैद्यांना केवळ शाकाहारी जेवणच दिले जाते. उपाहारगृहात कैद्यांच्या मागणीनुसार मांसाहारी अथवा शाकाहारी जेवण तयार केले जाते. त्यासाठीचे दर वेगळे असतात. कैद्यांकडून पनीरची अधिक मागणी असते.

Related Articles