पुणेकर उकाड्याने हैराण...!   

पुणे : मागील तीन दिवसांपासून पुणे आणि परिसरातील तपमानात विक्रमी वाढ झाली होती. दुपारी सूर्य अक्षरश: आग ओकत होता. गुरूवारी कमाल तपमानात किंचित घट झाली. मात्र, उष्ण व दमट वातावरणामुळे उकाडा कायम आहे. दिवसभर उन्हाचा तीव्र चटका आणि सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. पुण्यात काल ३९ अंश कमाल, तर २४.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली.
 
शहर आणि परिसरात पुढील काही दिवस कमाल आणि किमान तपमान स्थिर असणार आहे. येत्या बुधवारपर्यंत सायंकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. उपनगरात काही ठिकाणचे कमाल तपमान ४० अंशापेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहरात सकाळी दहानंतर उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी त्यात भर पडत असल्याने लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे विविध रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची संख्या कमी होत आहे. वाढलेल्या ऊन आणि उकाड्यामुळे पुणेकरांना दिवसा तसेच रात्री फॅन, कूलर आणि एसीचा वापर करावा लागत आहे. 
 
दरम्यान, कमी दाबाचा पट्टा पश्चिम राजस्तानपासून मराठवाड्यापर्यंत जात आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. राज्यात जळगाव येथे उच्चांकी ४३.७ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णता असण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
 
शहर व परिसरातील तपमान 
 
ठिकाण कमाल              किमान
लोहगाव ४१ अंश २६.५ अंश
कोरेगाव पार्क ४० अंश २६.४ अंश
शिवाजीनगर ३९ अंश २४.९ अंश
पाषाण ३९ अंश २३.६ अंश
मगरपट्टा ३९ अंश          २६.७ अंश
एनडीए ३८ अंश २४.६ अंश

Related Articles