पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी   

पुणे : पाकिस्तानातून मोबाईलवर संपर्क साधून पुण्यातील उद्योगपतीला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली. व्हॉईसनोट तसेच व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी तरुण उद्योजकाने दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हे कोरेगाव पार्क परिसरातील बोट क्लब रस्ता येथे राहण्यास आहेत. त्यांची स्वतःची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन) आहे. या कंपनीकडून हेलिकॉप्टर, तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात. तक्रारदार यांचा हा व्यवसाय भारतासह दुबई आणि इंग्लंड या देशामध्येही सुरू आहे.
 
तक्रारदार यांना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईलवर एका क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. मोबाईल क्रमांक पाकिस्तान येथील असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर, त्याच क्रमांकावरून पहिली व्हॉईसनोट तक्रारदार यांना प्राप्त झाली.
 
त्यांनी ती सुरूवातीला पाहिली नाही. त्यानंतर, काही वेळाने पुन्हा मेसेज आला़  ‘तू एका एव्हीएशन कंपनीचा मालक आहेस ना? नवीन हेलिकॉप्टर खरेदी करत आहेस ना?. हेलिकॉप्टर खरेदी करण्यापूर्वी काही रकम द्यावी लागेल.’ असे त्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर उद्योजकाला पुन्हा एक संदेश पाठविण्यात आला. ‘तुझी संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. पाच कोटी तयार ठेव. ही गोष्ट मजेत घेऊ नकोस, खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे संदेशात म्हटले होते.
 
तक्रारदार यांना अशा आशयाचा व्हॉईसनोट आल्यानंतर, सुरूवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर, २८ फेब्रुवारीला पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज आला. पाठोपाठ व्हाईस नोट आली. त्यात अर्वाच्य शिवीगाळ करुन गोळी मारली जाईल, असे म्हटले. दोन-दोन हेलिकॉप्टर घेण्यासाठी पैसे नाहीत, असे त्या व्हॉईस नोटमध्ये लिहिले होते. त्यानंतर १६ मार्च रोजी पुन्हा व्हॉईस नोटवरुन पाच कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर, तक्रारदार यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव पार्क पोलिस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
 
दरम्यान, उद्योजकाला धमकाविण्यासाठी ज्या क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. तो क्रमांक पाकिस्तानातील आहे. खंडणीखोराने ‘प्रॉक्झी सर्व्हर’चा वापर करुन उद्योजकाला धमकाविल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles