आयात शुल्कवाढीचा भडका कायम   

चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के शुल्क

बीजिंग : जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमधील आयात शुल्कवाढीचे चक्र अद्यापही कायम आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील आयात शुल्काचे प्रमाण १४५ टक्क्यांवर नेताच, चीनने अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क १२५ टक्के  केले. विशेष म्हणजे, अमेरिकेने संपूर्ण जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले असताना एकमेव चीन त्यास प्रत्युत्तर देत आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात संपूर्ण जगावर १० ते ४९ टक्क्यांपर्यंत ‘प्रत्युत्तर शुल्क’ लावले. यात भारताचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे, कॅनडा, रशिया, उत्तर कोरिया, मेक्सिको आणि बेलारुसला अमेरिकेने यातून वगळले होते.
 
अमेरिकेने चीनी वस्तूंवर ३४ टक्के, युरोपियन देशातील आयात वस्तूंवर २० टक्के, व्हिएतनाम २० टक्के, तैवान ३१ टक्के आणि जपानमधील वस्तूंवर २४ टक्के  आकारले होते.यानंतर, चीनने अमेरिकेपुढे झुकणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर, अमेरिकेने चीनवरील आयात शुल्कात दुप्पटीने वाढ केली. त्यास, चीनने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क १४५ टक्क्यांवर नेले. चीननेही हे शुल्क १२५ टक्क्यांवर नेले आहे.चीनने अमेरिकेविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत तक्रार केली असून अमेरिकन कंपन्यांवर आणखी निर्बंध आणले आहेत. चीनने मागील वर्षी अमेरिकेतून १६४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही आयात कमी होती. दरम्यान, अमेरिकेने चीनव्यतिरिक्त अन्य देशांवरील आयात शुल्कास ९० दिवसांसाठी म्हणजेच ९ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. पण, जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झाल्याने आर्थिक मंदीची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Articles