इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी होणार?   

ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्काचा भारताला फायदा

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे जगात व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे; पण या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांनी फायदा होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेसोबतच्या तणावामुळे चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना पाच टक्क्यांपर्यंत किमती कमी करण्याच्या ऑफर्स देऊ लागल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांत स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होऊ शकतात. 
 
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या मागणी वाढवण्यासाठी या सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत वापर होणार्‍या सर्व भागांपैकी सरासरी तीन-चतुर्थांश भाग चीनमधून आयात केले जातात.
 
अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. २ एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एकूण ५४ टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्याला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या आयातीवर ३४ टक्के शुल्क लादले. यानंतर लगेचच अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क १०४ टक्क्यांपर्यंत वाढवून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावर चीननेही अमेरिकेवर शुल्क वाढवून ते ८४ टक्के केले. यामुळे संघर्ष आणखीनच वाढला आहे.

भारतीय कंपन्यांना फायदा 

चीन आणि अमेरिकेतील व्यापार संघर्ष तीव्र झाल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील या संघर्षात भारतीय कंपन्यांना फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अधिक शुल्क लागू झाल्याने निर्यातदार कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कारण त्यांना आता अमेरिकेतून कमी ऑर्डर मिळत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना वाटाघाटी करण्याची संधी मिळू शकते. ते आता चीनमधून स्वस्त दरात वस्तू आयात करू शकतात. यामुळे मोबाइल, फ्रीज, टीव्ही या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
 

Related Articles