पोलिस कर्मचार्‍याच्या शेतात अमली पदार्थांचा कारखाना   

लातूर : लातूरमध्ये एका पोलिसाच्या शेतात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या कारखान्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत ११.३६ किलो मेफेड्रोन, प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे आणि साहित्य असे १७ कोटी रुपये किंमतीचे साहित्य जप्त् करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कारखाना मुंबईत कार्यरत असलेला पोलिस हवालदार प्रमोद केंद्रे चालवत होता. याप्रकरणी केंद्रे याच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
प्रमोद केंद्रे, महंमद शेख, जुबेर मापकर, आहाद मेमन, अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांची नावे अद्याप समोर आली नाहीत. या प्रकरणातील पाच आरोपींना चाकूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना १४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
लातूर जिल्ह्यातील रोहिना गावात केंद्रे याची शेती आहे. त्याने शेतात शेड उभारून त्यामध्ये मेफेड्रोन या अमली पदार्थांचा कारखाना सुरू केला होता. दरम्यान, मुंबईत वितरित होणार्‍या मेफेड्रोनचा स्त्रोत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर गुप्त माहिती संकलित करून मुंबई व पुणे पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईची रूपरेषा आखली. रोहिना गावातील एका शेतावर छापा टाकला. येथे पत्र्याच्या शेडमध्ये पूर्णपणे सुसज्ज असा अमली पदार्थाचा कारखाना आढळला. पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त करत १७ कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस हवालदारासह सात जणांना ताब्यात घेतले. 
 
तपासाअंती स्पष्ट झाले की, ही जमीन प्रमोद केंद्रे या पोलिस हवालदाराच्या नावावर आहे, जो नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होता. आठवड्यातील दोन ते तीन दिवस तो गावाला यायचा. या प्रकरणातील इतर आरोपींना तो कच्चा माल पुरवायचा. त्यानंतर तो मुंबई, पुणे यासह इतर शहरात अमली पदार्थ पुरवत होता. 

Related Articles