तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या   

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचा जीव घेईन, अशी धमकी दिल्याने कोर्‍हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. अंकिता शेखर कडाळे (वय-१५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. वडील शेखर सुनील कडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 
 
मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना जीवे मारीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती.   
 
सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने मुलगी भयभीत झाली होती.आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात  बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

Related Articles