आजी-माजी आमदारांना अजित पवार यांच्या कानपिचक्या   

पिंपरी : ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, अशी अण्णा बनसोडे यांची ख्याती आहे. त्यांना खूप मोठे पद मिळाले आहे. आता सर्वांचे बारीक लक्ष राहणार आहे. आपल्या चिरंजीवांना चांगल्या चार गोष्टी सांगा, मी पण माझ्या चिरंजीवांना सांगत असतो. ‘गडी अंगाने उभा नी आडवा’ म्हणत एका ठिकाणी राहून काम करावे लागते. तळ्यात-मळ्यात चालणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजी-माजी आमदारांचे कान टोचले.
 
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे काही पदाधिकारी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘‘महायुतीचे सरकार निवडून आल्यानंतर विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. पण, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार सत्तेत आले. आमच्यावर टीका केली तरी चालेल पण, गरिबांचा विचार आम्ही कधी सोडणार नाही. आर्थिक शिस्त बाळगून शहरांचा विकास केला पाहिजे. विमानतळ करताना काही भूधारकांच्या जमिनी जात आहेत. 
 
जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना त्याला विरोध करणे योग्य नाही. रिंगरोडचेही काम मार्गी लागत आहेत. यात देखील स्थानिकांच्या जमिनी जाणार आहेत. पण, त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. शहरातील मेट्रो चाकण एमआयडीसीपर्यंत केली जाणार आहे. वाकड, रावेतचा भाग मेट्रोला जोडला जाणार आहे.इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नदी सुधार प्रकल्पाबाबत काहींचे वेगळे मत आहे, त्याचा जरूर विचार केला जाईल. 
 
चांगल्या गोष्टींसाठी दोन पाऊले पुढे किंवा मागे येण्याची आमची तयारी आहे. पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणाचे पाणी कमी पडत आहे. भामा-आसखेडचे पाणी आणले जात आहे, आंद्रा धरणातील पाणी घेत आहोत, तरीही पाण्याची कमतरता भासत आहे. यापुढील पन्नास वर्षाचा विचार करून, पाण्याचे नियोजन करावे लागेल. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील.पीएमआरडीएच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करताना शंभर मीटरहून अधिक मोठे रस्ते केले जाणार आहेत. म्हाडा, एसआरए, महापालिका, पीएमआरडीएच्या माध्यमातून गृहनिर्माणाला चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
‘तीन मतदारसंघाचे पाच झाले तर आश्‍चर्य नको’
 
२०४१ पर्यंत पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या ६० लाख होण्याचा अंदाज आहे. कारण लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागतं नाही. लोकांनी मनावर घेतलं, की लोकसंख्या वाढते, असे विधान अजित पवारांनी करताच एकच हशा पिकला.१९९१ ला खासदार होतो. तेव्हा, हवेली हा एकच विधानसभा मतदारसंघ होता. आता तीन मतदारसंघ आहेत. २०२९ ला पाच मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका. चिंचवड आणि भोसरीमध्ये दोन-दोन, पिंपरीत एक विधानसभा मतदारसंघ होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Related Articles