डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पुल बांधण्यात येत आहे. त्या पुलावरून वाहतूक करणे सुलभ व्हावे म्हणून निगडी-दापोडी मार्गावर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या कामासाठी महापालिकेने थेट पद्धतीने सल्लागार नियुक्त केला आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी एका भुयारी मार्गाची भर पडणार आहे.
 
महापालिकेच्या वतीने डेअरी फार्म येथे उड्डाण पुल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. या वाहनांना लांब अंतरापर्यंतचा वळसा मारून ये-जा करावी लागू नये म्हणून पुल जेथून सुरू होतो, त्या ठिकाणी निगडी ते दापोडी मार्गावर भुयारी मार्ग निर्माण करण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी असणार आहे. मेट्रोच्या मार्गाखालून निर्माण झालेला हा शहरातील पहिलाच भुयारी मार्ग ठरणार आहे. भुयारी मार्ग उभारण्यास महामेट्रोने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली आहे.
 
या भुयारी मार्गामुळे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक किंवा नाशिक फाटा चौकातून वळसा मारून ये-जा करण्याची आवश्यक भासणार नाही. हा भुयारी मार्ग बांधावा म्हणून माजी नगरसेवकांनी मागणी केली आहे. त्याला आयुक्तांनी तात्काळ होकार दिला असून, त्या कामासाठी थेट पद्धतीने सल्लागार नेमण्यात आला आहे. निगडी ते दापोडी मार्ग अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार विकसित करण्यात येत आहे. त्या कामासाठी मॅप्स ग्लोबल सिव्हीटेक प्रा. लि. एजन्सी सल्लागार म्हणून काम करीत आहे. त्यामुळे त्या एजन्सीची थेट पद्धतीने भुयारी मार्गाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कामासाठी एकूण १.९९ टक्के शुल्क त्या एजन्सीला दिले जाणार आहेत. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

Related Articles